औरंगाबाद | 15 सप्टेंबर 2023 : मराठावाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्ताने उद्या औरंगाबाद येथे कॅबिनेटची बैठक होणार आहे. या बैठकीची राज्य सरकारने जय्यत तयारी केली आहे. या बैठकीसाठी अख्खं मंत्रिमंडळ उद्या औरंगाबादेत येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स बुक करण्यात आले आहेत. विश्राम गृहेसुद्धा बुक करण्यात आले आहे. या बैठकीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. आम्ही या सरकारचे थाटामाटत अंत्यसंस्कार करणार आहोत, असा इशाराच खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. हे सरकार थाटामाटातच मरणार आहे. या सरकारचे अंत्यसंस्कार थाटामाटातच करणार आहोत. तीन तासासाठी संपूर्ण प्रशासन वेठीस धरता. इथे दुष्काळ आहे. प्यायला पाणी नाहीये. अनेक प्रश्न आहेत. त्यावर हा संपूर्ण खर्च करा. उगाच वायफळ खर्च कशाला करता? आमचं लक्ष बैठकीकडे आहे. बैठकीनंतरच्या पोपटपंचीकडे जास्त आहे, असं संजय राऊत म्हणाले.
मराठवाडा मुक्ती संग्रामच्या बॅनर्सवर या संग्रामातील नेत्यांचा फोटो नाही. त्यावरूनही संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली. स्वामी रामानंद तिर्थ, गोविंदभाई श्रॉफ, शंकरराव चव्हाण आदी नेते या संग्रामात होते. त्यांचेच फोटो नाहीत. मग हे नेते स्वातंत्र्य संग्रामात नव्हते तर काय मोदी, शाह आणि रावसाहेब दानवे संग्रामात होते का? असा खोचक सवाल राऊत यांनी विचारला.
हे सरकार उद्या मराठवाड्यात येत आहे. त्यानिमित्ताने अव्वाच्या सव्वा खर्च केला जात आहे. शासन आपलं दारी हे रॅकेट आहे. आपल्याच लोकांना पाच ते दहा कोटींची कामे देण्यासाठी हे चाललं आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांना जबरदस्तीने बोलावलं जात आहे. या बेकायदेशीर सरकारचा निर्णय कोर्टात टिकणार नाही. प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांना या खर्चाचा जाब द्यावा लागेल. सरकार बेकायदेशीर असताना हा खर्च का करत आहेत. कलेक्टरने सर्व हॉटेल बुक केली आहेत. कोण करतंय हे? या सर्वांचा विचार केला पाहिजे, असं राऊत म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला येणार होते. पण त्यांचा दौरा अचानक रद्द झाला. त्यावरूनही त्यांनी शाह यांच्यावर निशाणा साधला. अमित शाह आले नाहीत. त्यांनी शहाणपणाचा निर्णय घेतला आहे. शाह न आल्याने आमचा भ्रमनिरास झाला. आम्ही त्याचं जोरदार स्वागत करणार होतो. आमची संपूर्ण तयारी निष्फळ ठरली, असं ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना 49 हजार कोटींच्या घोषणा केल्या होत्या. एक तरी कवडी या मराठवाड्यात आलीय का? अनेक घोषणा केल्या. काय झालं त्या घोषणाचं? सव्वा लाख लोकांना दूध डेअरीच्या योजनेतून रोजगार देण्याची घोषणी केली होती. कुठे गेल्या गाई, म्हशी? असा सवाल करतानाच मराठवाड्यातील जनतेच्या तोंडाला पाने पुसण्यासाठी हे सरकार येत आहे, असा हल्लाच त्यांनी चढवला.