औरंगाबाद | 30 जुलै 2023 : ठाकरे गटाच्या काल झालेल्या उत्तर भारतीयांच्या मेळाव्यातून ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीही प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गद्दारांना माफी नाही, असं प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या. मुळात त्या स्वत: काँग्रेसमधून गद्दारी करून शिवसेनेत आल्या आहेत. त्या आम्हाला गद्दार म्हणत आहे. प्रियंका चतुर्वेदी यांचं सौंदर्य पाहून त्यांना आदित्य ठाकरे यांनी राज्यसभा सदस्य केलं, असं चंद्रकांत खैरेच म्हणाले होते, असं धक्कादायक विधान करतानाच प्रियंका चतुर्वेदींनी आम्हाला गद्दार म्हणावं हा मोठा जोक आहे, असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला.
आमदार संजय शिरसाट मीडियाशी संवाद साधत होते. उद्धव ठाकरे यांची कालची सभा उत्तर भारतीयांसाठी नव्हतीच. या सभेमध्ये काही उत्तर भारतीय लोक होते. तर काही ठाकरे गटाचे शिवसैनिक होते. त्यामुळे ही संपूर्ण सभा उत्तर भारतीयांची होती असं म्हणता येणार नाही, असं संजय शिरसाट म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी ठाण्यामध्ये झालेल्या सभेमध्ये आनंद दिघे यांचे नाव घेतले. दिघे साहेबांनी जी शिवसेना उभी केली त्यात एकनाथ शिंदे, राजन विचारे यांना तिकीट देण्यापासून ते निवडणुकीला उभे करण्यापर्यंत आनंद दिघे यांचा हात होता. उद्धव ठाकरे यांना सर्वसामान्यांबद्दल कधीही कळवळा नव्हता. सामान्यांबद्दल कधीही ते चांगलं बोलले नाहीत. उलट आनंद दिघे यांना डॅमेज कसं करता येईल असे प्रकार उद्धव ठाकरे यांनी केले, असा दावा शिरसाट यांनी केला.
मी दिघे साहेबांना शंभर वेळेस भेटलो असेल. दिघे साहेबांच्या अंत्ययात्रेला कोण का नाही आलं? व्हिडिओ आहे ना त्यांच्याकडे? बघावा त्यांनी. दिघे साहेबांसारखा माणूस नव्हता. परंतु दिघे साहेबांना संपवण्यासाठी काय काय कटकारस्थाने केली आणि कसे त्यांचे साथीदार मारल्या गेले हे सर्वांना माहीत आहे. भांडुपचा थापा का मारला गेला? असे प्रश्न उपस्थित होतात, असा सवालही त्यांनी केला.
दिघे साहेबांची बरोबरी करण्याची उद्धव ठाकरे यांची लायकी नाही. आम्ही आनंद दिघे यांना अजूनही दैवत मानतो. आज दिघे साहेबांचा फोटो महाराष्ट्रात सर्व बॅनरवर दिसतो. अगोदर का दिसत नव्हता? तुम्हाला आपुलकी नव्हती. दिघे साहेबांनी ठाणे बंद म्हटलं तर एक टपरी सुद्धा चालू राहत नव्हती, असा एक काळ होता. उद्धव ठाकरे आता म्हणाले, ठाणे बंद तर ठाणे बंद होणार नाही. त्यामुळे आनंद दिघे यांची बराबरी उद्धव ठाकरे यांनी करू नये, असा टोला त्यांनी लगावला.