औरंगाबादः कोरोनाची तिसरी लाट आणि ओमिक्रॉन (Omicron) विषाणूचं संकट असूनही पूर्ण खबरदारी बाळगत अखेर औरंगाबाद महानगरपालिकेने येत्या सोमवारपासून शहरातील शाळांचे (Aurangabad School) पहिली ते सातवीचेही वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या सोबतच महापालिकेने शाळांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. प्रत्येक बाकावर एक विद्यार्थी तर दोन बाकांमध्ये सहा फुटांचे अंतर असावे, अशी व्यवस्था करण्याच्या सूचना शाळा व्यवस्थापनाला देण्यात आल्या आहेत.
मराठवाड्यात लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ओमिक्रॉन विषाणूचा शिरकाव झाल्याने पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. त्यातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांवर जास्त परिणाम होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याने मुलांना शाळेत पाठवावे की नाही, असा प्रश्न पालकांसमोर उभा राहिला आहे. मागील वर्ष ऑनलाइन शिक्षणाद्वारे काढले असल्याने हेही वर्ष त्याच पद्धतीने शिक्षण सुरु रहावे, अशा मनःस्थितीत काही पालक आहेत. मात्र शाळा व्यवस्थापनाची मुलांना शाळेत बोलवण्याची पूर्ण तयारी झाली आहे. अनेक शाळांमध्ये वर्गांची साफसफाई, निर्जंतुकीकरण, बाकांमधील अंतर आदी व्यवस्था चोख पद्धतीने केली जात आहे. ऑनलाइन पद्धतीने शिक्षण असल्यामुळे अनेक पालकांनी शाळांचे शुल्क भरलेले नाही. एकदा प्रत्यक्ष शाळा सुरु झाल्यावर पालकांशी बोलता येईल आणि शुल्काचा प्रश्न काही अंशी मार्गी लागेल, अशी अपेक्षा शाळा व्यवस्थापनाची आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्यासाठी व्यवस्थापनाची घाई सुरु आहे.
कोरोनाचा संसर्ग ओसरला असल्याने महापालिकेने आता शहरातील पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यासही परवानगी दिली आहे. आतापर्यंत या वर्गांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण दिले जात होते. मात्र काही सूचनांचे पालन केल्यास विद्यार्थ्यांना आता ऑफलाइन शिक्षणासाठी शाळेत बोलावता येईल, अशी परवानगी महापालिकेने दिली आहे. यासाठी पालिकेने काही मार्गदर्शन सूचना जाहीर केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे-
– शाळा सुरु होण्यापूर्वी 48 तास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना RTPCR करणे बंधनकारक राहणार.
– पालकांनी शाळेच्या परिसरात गर्दी करणे टाळावे.
– वर्गात गर्दी टाळण्यासाठी जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांत शाळा भरवावी
– एका बाकावर एकच विद्यार्थी तर दोन बाकांमध्ये सहा फूट अंतर ठेवावे.
– एका वर्गात 15 ते 20 विद्यार्थी बसतील, अशी आसनव्यवस्था असावी.
– विद्यार्थ्यांना शाळेत बोलावताना ठराविक महत्त्वाच्या विषयांसाठीच प्राधान्य द्यावे.
– मध्यंतराची सुटी न देता वर्गातच सुरक्षित अंतर ठेवून जेवणाची व्यवस्था करावी लागेल.
इतर बातम्या-