औरंगाबाद : राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबरोबर शिवसेनेतले तब्बल 40 आमदार गेले, तसेच इतर अपक्ष 10 आमदार गेले, असा एकनाथ शिंदे यांनी पन्नास आमदारांचा आकडा (Shivsena MLA) पार केला. त्यानंतर आता एकापाठोपाठ एक खासदार ही शिंदे गटात जात आहे, अनेक कार्यकर्तेही शिंंदे गटात जात आहेत. मात्र दुसरीकडे ठाकरे गटातल्या नेत्यांनी महाराष्ट्रातला रान पेटवून उठवलं आहे. औरंगाबाद येथे अनेक आमदारांनी बंडखोरी केल्याने आता आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी या आमदारांवर सडकून टीका केली आहे. तसेच आमदारांना निवडून न येण्याबाबत इशाराही दिला आहे, अंबादास दानवे शिंदे यांचं बंड झाल्यापासूनच टीका करण्यात आघाडीवर आहेत, मात्र आजची त्यांची ही टीका आणि निधी बाबत केलेलं वक्तव्यही बरेच चर्चेत आहे.
यावेळी बोलताना अंबादास दानवे म्हणाले, पाच जणांनी बंडखोरी केली पण या पाच पैकी एकही आमदार निवडून येणार नाही. इथला पश्चिमचा आमदार म्हणजेच संजय शिरसाठ यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि आरोप केला मुख्यमंत्री भेटत नाहीत, पण माझ्यासोबत हा कित्येक वेळा मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीला उपस्थित होता, दीड हजार कोटी रुपयांची कामे या मतदारसंघात झाली, अशा दावा दानवे यांनी यावेळी केला आहे. तर विमानतळाचे नाव बदलण्याचा आम्ही निर्णय घेतला, पण हे केंद्र सरकार तो निर्णय घेत नाही, असा आरोप त्यांनी केलाय. तर भाजप सरकारचे हिंदुत्वाचे प्रेम म्हणजे पुतना मावशीचे प्रेम आहे, अशी घणाघाती टीका दानवे यांनी केला आहे.
तर आमदारांनी मुंबईत जे मेळावे घेतले त्यावरूनही त्यांनी खोचक टोले लगावले आहेत. मुंबईला मेळाव्याला बस मधून माणसे नेली, मात्र 50 माणसांच्या बस मध्ये फक्त 4 माणसे होती.
तसेच मेळाव्याला गेलेल्या लोकांचे अजूनही पैसे दिलेले नाहीत, असे म्हणत त्यांनी शिंदे गटातील आमदारांची खिल्ली उडवली आहे. तर संदीपान भुमरे म्हणतात उध्दव साहेबांसाठी सातव्या मजल्यावरून उडी मारतो, या भूमरेंच्या खात्याला दीड हजार कोटी रुपये दिले, पानंद रस्ते 300 कोटी, ज्ञानेश्वर उद्यानाला दिले. पाच वेळा आमदार झाले, एकदा कॅबिनेट दिलं, काय अन्याय केला सांगा? तर संजय शिरसाठ यांना 3 वेळा आमदार केलं, काय अन्याय केला? हा धब्बा आपल्याला लागला आहे, येणाऱ्या काळात आपल्याला धब्बा पुसायचा आहे, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.