औरंगाबाद: शिवसेनेने कधीच मुस्लिमांना ठरवून विरोध केला नाही. शिवसेना ही सर्वसमावेशक असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. शिवसेनेने हिंदुत्वाचा विचार आणि आधार कधीही सोडलेला नाही. आमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येमध्ये सर्व जातीधर्मांना स्थान आहे. हिंदुत्व हेच आमचं राष्ट्रीयत्व आहे. जे या राष्ट्राला आणि मातृभूमीला मानतात, ते आमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत बसतात, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. ते शनिवारी औरंगाबादमधील पत्रकारपरिषदेत बोलत होते.
देशातील वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी शिवसेनेकडून औरंगाबादेत आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. संजय राऊत या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. यानिमित्ताने ते औरंगाबादमध्ये आले आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी अनेक विषयांवर संवाद साधला. राज्यात महाविकासआघाडीतील तिन्ही पक्ष एकत्रच काम करत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे वेगवेगळे नसून एकच आहेत. शरद पवार हे महाविकासआघाडीचे प्रमुख आहेत, तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. ज्यावेळी राज्यासंदर्भात कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर महाविकासआघआडीतील तिन्ही पक्ष तो एकत्र मिळून घेतील, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
अनिल देशमुख यांची तब्येत बरी नाही. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून त्यांना त्रास दिला जातोय, त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. कोणतीही तपासयंत्रणा अशाप्रकारे काम करत नाही. अनिल देशमुख हे राज्याचे माजी गृहमंत्री होते. त्यांची तब्येत बरी नसेल तर त्यांना रुग्णालयात दाखल केले पाहिजे, असे राऊत यांनी म्हटले. तसेच भाजपच्याही अनेक नेत्यांची प्रकरणं समोर आली आहेत. ईडीला त्यांचे पत्ते माहिती नसतील तर आम्ही मदत करतो. आम्ही त्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांना भेटू, असेही राऊत यांनी सांगितले.
राज्यातील एसटी कामगारांचा संप कोण चिघळवतंय, हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. ज्यांनी आजवर कामगारांच्या घाम आणि श्रमाचा नेहमीच तिरस्कार केला ते आज एसटी कामगारांच्या बाजूने उभे राहिले आहेत. मात्र, एसटी कामगारांना भडकावण्याचा प्रयत्न यशस्वी ठरणार नाही. एसटी कामगारांचा प्रश्न हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्यापासून प्रलंबित आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
रजा अकादमीवर बंदी घाला, नाही तर आम्ही त्यांना संपवू, महाराष्ट्रातल्या दंगलीवर राणेंचा इशारा
लोकमान्य टिळकांचं ‘ते’ वाक्य कंगनाला तंतोतंत लागू पडतं; शिवसेनेचा सणसणीत टोला
Salman Khurshid: “माझे पुस्तक हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी, न्यायालयाचा अयोध्येवरील निकाल चांगला आहे”