औरंगाबादः स्मार्ट सिटी औरंगाबादमधील महापालिकेचे (Aurangabad corporation) बहुतांश काम आता ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत मनपाच्या विविध सेवा डिजिटल स्वरुपात येतील, असा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. स्मार्ट सिटी (Smart city Aurangabad) अंतर्गत जी आय एस आणि मॅपिंग गव्हर्नर्स अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या विविध कामाची आढावा बैठक आज मंगळवारी महानगरपालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी विविध विषयावर चर्चा होऊन आयुक्तांनी काही सूचना देत कामे लवकरच पूर्ण करण्याचे आदेश दिले.
या बैठकीत स्मार्ट सिटी अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या डिजिटलायझेशनच्या योजनेवर मार्स ही एजन्सी काम करत आहे. यावेळी महापालिकेत राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पाचे सादरीकरण केले तसेच झालेल्या कामाची माहिती दिली त्यात सॉफ्टवेअर, इंटिग्रेशन मोबाईल ॲप व आपत्ती व्यवस्थापन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांसाठी असलेल्या या मोबाईल ॲप वर प्रोपर्टी टॅक्स, पाणीपट्टी ऑनलाईन करण्यासाठी पद्धती तयार करण्यात आली आहे .
मनपातर्फे नवे मोड्युल प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणार आहे. तसेच नोव्हेंबर अखेरपर्यंत 30 ते 40 विविध सुविधांसाठी ते विकसित करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महानगरपालिकेच्या अभिलेखांचे संगणीकरण करण्यासाठी स्कॅनिंगचे काम सुरू असून नागरी समस्याबाबत तयार करण्यात आलेल्या मोबाईल ॲपवर नागरिकांनी आपल्या समस्या एसएमएसद्वारे टाकल्यास त्या संबंधित विभागाला याची माहिती मिळणार आहे. सदरील माहिती मिळताच संबंधित विभागाच्या वतीने त्या तक्रारीची दखल घेऊन त्याची निवरण केले जाईल. याची माहिती एस एम एस द्वारे नागरिकांना मिळणार आहे. तसेच नागरिकांनी नोंदवलेल्या समस्यांची नोंद घेण्यात आली आल्याबाबतचे मेसेजदेखील संबंधित नागरिकाला कळवण्यात येतील.
नागरिकांसाठी या सेवांनुसार रेटिंग सिस्टीमदेखील उपलब्ध राहणार आहे. पुढील टप्प्यात नागरिक मदत केंद्र तसेच एक खिडकी योजना राबवण्यात येणार आहे. यावेळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी विविध कामाचा आढावा घेऊन जीआयएस मॅपिंग करताना विविध शासकीय योजनांनुसार सूचना दिल्या. तसेच ड्रेनेज लाईन, सार्वजनिक शौचालयाचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, शहर अभियंता एस डी पानझडे, कार्यकारी अभियंता बी. डी. फड, डी के पंडित, उप आयुक्त संतोष टेंगले, सौरभ जोशी, अपर्णा थेटे, स्मार्ट सिटीचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे व सर्व विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती.
इतर बातम्या-