औरंगाबादः एसटी महामंडळाच्या शासकीय सेवेत सामावून घ्यावे, वेतनवाढ द्यावी यासह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी संघटनांच्या नेतृत्वात दिवाळीपासून संपावर आहेत. औरंगाबादमधील सिडको आणि मध्यवर्ती बसस्थानकातील सर्व कर्मचाऱ्यांनी रविवारी संपात सहभाग नोंदवला. रविवारी दुपारी टप्प्याटप्प्याने बारा वाजेपर्यंत संपूर्ण बससेवा ठप्प करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. दिवसभरात शहरातील दोन्ही आगारातील 223 बस फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे एसटीचे 24 लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले तर जिल्ह्यातील सर्वच आगारातील मिळून एकूण 916 बसच्या फेऱ्या काल रद्द करण्यात आल्या.
सोमवारी राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या दिवाळीच्या सुट्या संपत आहेत. कामाचा दिवस असल्याने अनेकांना आपापल्या ड्युटीच्या गावी जायचे आहे. मात्र बस सेवा बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. यात शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनांनीही असा स्थितीत दाम दुप्पट घेण्याची पद्धती अवलंबली आहे. तसेच प्रवाशांना अत्यंत दाटीवाटीत प्रवास करावा लागत आहे. यात महिला, लहान मुले व ज्येष्ठांचे हाल होत आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीने एसटी महामंडळासोबत चर्चा करून 28 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून संप सुरु केला . तर काही संघटनांनी केवळ विरोध दर्शवून कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून वेतन भत्ते द्यावे, या मागणीसाठी आंदोलन सुरु ठेवले. ऐन दिवाळीत बससेवा बंद असल्याने प्रवाशांचे हाल झाले. हे पाहून महामंडळाने उच्च न्यायालयात धाव घेतली. महामंडळाच्या याचिकेवर सुनावणी होऊन संघटनांनी संप मागे घ्यावा, असे आदेश देण्यात आले. मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी कोर्टाचा आदेश धाब्यावर बसवत संप सुरूच ठेवला आहे. आता सर्वच ठिकाणची बससेवा 100 टक्के बंद असून प्रवाशांची कोंडी होत आहे.
इतर बातम्या-