औरंगाबाद: गेल्या तीन दिवसांपासून सूर्यदर्शन न झालेल्या शहरवासियांनी (Sunrise in Aurangabad)आज काही मिनिटं का होईना स्वच्छ सूर्याचं दर्शन घेतलं. अनेक दिवसांनी उन्हाची किरणं घरात आल्यामुळे नागरिकांना हायसं वाटलं. यंदाच्या अतिवृष्टीच्या तडाख्यात (Heavy Rain in Marathwada) ग्रामीण भागासह शहरातील नागरिकांनाही जास्त बसला. मात्र आज 29 सप्टेंबर रोजी सकाळी ढगांनी काहीशी उघडीप दिली. त्यामुळे सूर्याचं दर्शन नागरिकांना होऊ शकलं. आता पुढील तीन दिवस पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागातर्फे (Meteorological department) वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान मराठवाड्यातील सर्वात मोठे जायकवाडी धरण 94 टक्के भरले असल्याने धरणाचे चार दरवाजे आज सकाळी अकरा वाजता उघडण्यात आले आहेत. तसेच प्रशासनातर्फे गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सप्टेंबर महिन्यातील दिवसभरातील एकूण चित्र पाहता, सकाळी थोडेसे आकाश मोकळे असते. मात्र दुपारी चार नंतर आभाळ ढगांनी भरून येते आणि पावसाला सुरुवात होते. 07 आणि 27 सप्टेंबर रोजीदेखील असेच वातावरण होते. या दोन्ही दिवशी औरंगाबाद आणि परिसराने ढगफुटीपेक्षाही भयंकर असे पावसाचे रौद्र रुप अनुभवले. औरंगाबादचे नागरिक हा पाऊस कधीही विसरणार नाहीत, अशी स्थिती आहे. म्हणूनच दुपार झाली, ढग दाटून आले की, नागरिकांना आता पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडतो की, काय अशी भीती वाटतेय.
शहरात ठिकठिकाणी नादुरुस्त रस्ते, नालेसफाई न झाल्याने तुंबलेले रस्ते, प्रचंड संथ गतीने सुरु असलेली रस्त्यांची कामे यामुळे नागरिक प्रचंड हैराण आहेत. तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या घरात, शिवारात पाण्यानं नासधूस केल्यानं शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळलं आहे. त्यामुळे आता पाऊस नको रे बाबा, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
दिनांक 29 सप्टेंबर रोजी औरंगाबाद व जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
दिनांक 01 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली व बीड जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
दिनांक 02 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद, जालना बीड व परभणी जिल्ह्यात तुरळख ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
दिनांक 03 ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, ही माहिती डॉ. के.के . डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्याकडून देण्यात आली आहे.
इतर बातम्या-
Marathwada rain : आधीच पावसानं धुतलं, त्यात जायकवाडीचे तब्बल 18 दरवाजे उघडले, मराठवाड्यात पूरस्थिती