औरंगाबाद : शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंनी मंत्री गुलाबराव पाटलांनंतर आता संदीपान भुमरेंच्या पैठणमध्ये सभा घेतली. या सभेत पैठणसाठी भुमरेंनी काय केलं, जो निधीचा दावा झाला, तो मंजूर झालाय का, असे अनेक प्रश्न अंधारेंनी विचारलेयत. त्यावर भुमरेंनी देखील उत्तर दिलंय. गुलाबराव पाटलांनंतर सुषमा अंधारेंनी आता मंत्री संदीपान भुमरेंकडे मोर्चा वळवलाय. पैठणमधल्या सभेत अंधारेंनी भुमरे आणि भाजपच्या रावसाहेब दानवेंवर टीका केली. पैठणच्या विकासासाठी दोघांनी नेमकं काय केलं? याचा हिशेब देण्याची मागणी केलीय, त्यावर मंत्री संदीपान भुमरेंनी केलेल्या कामांची यादी वाचून दाखवलीय.
पैठणमध्ये पाण्याची टंचाई असताना दारुचे आठ-आठ कारखाने कसे चालतात? असा प्रश्न करताना अंधारेंनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींची नक्कल करत भुमरेंवर निशाणा साधला.
दरम्यान, पन्नास खोक्यांचा विषय जर पुन्हा काढला, तर नोटीस पाठवू, असा इशारा देणाऱ्या शिंदे गटाच्या विजय शिवतारेंना सुषमा अंधारेंनी आव्हान दिलंय.
भुमरेंनी सुरु केलेल्या साखर कारखान्यात मनी लाँड्रिंगचा आरोप ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंनी केलाय. तो आरोप फेटाळत शक्य असेल ती चौकशी करण्याचं आव्हान संदीपान भुमरेंनी दिलंय.
महाप्रबोधन यात्रेत सुषमा अंधारेंनी गुलाबराव पाटलांना टार्गेट केलं होतं. मात्र त्यानंतर सरकार आणि खासकरुन शिंदे गटाचे अनेक मंत्र्यांवर सुषमा अंधारे निशाणा साधू लागल्या आहेत.