औरंगाबाद: नवरात्र, दसरा, ईद या उत्सवानंतर आता दिवाळीच्या सणासाठी औरंगाबादच्या बाजारपेठा (Boom in Aurangabad market) सज्ज आहेत. उत्सवांनी सुरु झालेला हा आनंद दिवाळीपर्यंत आणखीच द्विगुणित होण्याची चिन्हे आहेत. कारण येत्या 14 दिवसात शहरात 800 कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज जिल्हा व्यापारी महासंघाने व्यक्त केला आहे. औरंगाबादेतील कापड, इलेक्ट्रॉनिक्स, दुचाकी, मिठाई, भेटवस्तूंच्या बाजारात ग्राहकांना विशेष सूट दिली जात आहे तर कामगारांनाही बोनसची (Bonus for workers) सुविधा दिली जाणार असल्याचा अंदाज आहे. कंपन्यांतील कामगारांच्या हाती 125 कोटी रुपयांचा बोनस पडणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे औरंगाबादकरांची दिवाळी यंदा दणक्यात होईल, अशी चिन्हे आहेत.
बजाज कंपनीने मंगळवारी बैठक घेऊन 27 हजार 180 रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. सोमवारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात बोनसची रक्कम जमा होईल. बजाज ऑटो कामगार संघटनेचे अध्यक्ष विजय पवार यांनी सांगितले की, कंपनीत 2300 कामगार व 450 अधिकाऱ्यांना मागील वर्षापेक्षा दीड हजार रुपये जास्त बोनस मिळणार आहे.
तर गुडईअर कंपनी यंदा कामगारांना 52 हजार रुपये बोनस देणार आहे, अशी माहिती मुंबई श्रमिक संघाचे नेते लक्ष्मण लांडे यांनी दिली.
21 ते 30 ऑक्टोबरदरम्यान औद्योगिक वसाहतींत सुमारे 75 लाख ते 100 कोटी रुपयांदरम्यान बोनस व त्यासोबत नोव्हेंबर महिन्याचा पगारही दिला जाणार आहे, अशी माहिती सीएमआयएच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
औरंगाबादमधील विविध कंपन्या, लहान मोठे उद्योग, कारखाने हेच या नगरीचे मोठे वैभव आहे. या उद्योगांमुळेच तर औरंगाबादचे नाव जगात नावाजलेले आहे. सध्या औद्योगिक वसाहतींमध्ये 4500 उद्योग आहेत. तर येथील कामदारांची एकूण संख्या 2,50,000 एवढी आहे. यंदा येथील कामगारांना 125 कोटी रुपयांचा बोनस मिळणार, असा अंदाज आहे. मागील वर्षी कोरोना काळातही कंपन्यांनी कामगारांना 75 कोटींचा बोनस दिला होता. यंदा वातावरण चांगले आहे. त्यामुळे सर्व कंपन्या मिळून 125 कोटींच्या जवळपास बोनस दिला जाणार आहे. अनेक कंपपन्या तर एक महिन्याच्या पगाराएवढा बोनस देतात, अशी माहिती सीएमआयएचे अध्यक्ष शिवप्रसाद जाजू यांनी दिली.
कोरोनाचे सावट कमी झाल्यामुळे बाजारालाही उभारी मिळाली आहे. इलेक्ट्रॉनिक बाजार फुलला आहे. शोरुमसमोर आकर्षक स्वागत कमानी उभ्या ठाकल्या आहेत. विविध उपकरणांवर डिस्काउंट, बक्षीस यासह इतर ऑफर दिल्या जात आहेत. 43 इंच टीव्हीला यंदा मोठी मागणी राहिल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच चारचाकी, दुचाकीची बुकिंगदेखील जोरात सुरु आहे. रात्री अकरा वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने याचाही सकारात्मक परिणाम होणार आहे. केवळ रियल इस्टेट व कापड बाजारातच 400 कोटींपर्यंत उलाढाल अपेक्षित आहे.
इतर बातम्या-
औरंगाबाद-जालन्यात घरफोड्या करणारे दोघे अटकेत, वर्षात 28 घरफोड्या, साडे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त