औरंगाबादः राज्यभर पसरलेले पोलिसांचे जाळे सतर्क असले आणि वेळेवर मदत मिळाली तर अनेक गंभीर प्रकार होण्यापासून रोखता येतात, याचाच दाखला औरंगाबादमध्ये घडलेल्या घटनेतून मिळाला. वडील रागावल्याने 15 वर्षांचा मुलगा घरातून रात्रीच्या वेळी निघून गेला. ही माहिती पोलिसांना कळाली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने तो कुठे गेला, कोणत्या ट्रेनमध्ये बसला, या सगळ्याची माहिती रात्रीतून मिळवली. सुदैवाने मुंबईत ट्रेन थांबताच मुलगा उतरला तेव्हा तो सुरक्षित हातातच सापडला.
झालं असं की, सातारा परिसरातील एका घरातील 15 वर्षाच्या मुलाला वडिलांनी रागवालं. याचं कारण होतं, त्याने वडिलांच्या पाकिटातून 100 रुपये काढले. गोल्डन कलरचा पेन घेण्यासाठी त्याने हे पैसे घेतल्याने वडिलांनी मुलाला रागावले आणि त्या मारही बसला. या सगळ्या प्रकाराचा राग मनात धरून मुलगा घराबाहेर पडला. काही वेळात तो परत येईल, असे सगळ्यांना वाटले. पण रात्रीचे 9 वाजले तरी मुलगा आला नाही, म्हणून घाबरलेले नातेवाईक सातारा पोलीस स्टेशनला पोहोचले. त्यांची भेट पोलीस निरीक्षक पातारे यांच्याशी झाली. त्यानंतर पोलिसांनी लगोलग तपासाची सूत्र हलवली.
सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गौतम पातारे हे रात्रगस्तीवर असताना 15 वर्षांचा मुलगा घरातून निघून गेल्याची माहिती त्यांना कळली. त्यांनी रेल्वे पोलीस स्थानकात धाव घेत पहाटेपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यात मुलगा मुंबईकडे जाणाऱ्या नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये चढताना दिसला. पोलिसांनी सर्व स्थानकांतील पोलिसांकडे मुलाचे छायाचित्र पाठवले. पण तो रस्त्यात कुठेही उतरला नाही. मुंबईत सकाळी 6 वाजता सीएसटी स्थानकात उतरताच रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
इतर बातम्या-