औरंगाबादः रेल्वेत बसल्यावर काही महत्त्वाच्या कारणासाठी रेल्वे थांबवायची असल्यास प्रत्येक कोचमध्ये चेन ओढण्याची (Railway pulling the chain) सुविधा देण्यात आली आहे. मात्र ही सुविधा अत्यंत गंभीर कारणांसाठीच वापरायची असते. अगदी साध्या गोष्टींसाठी अवघी रेल्वेच वेठीला धरणे प्रवाशांना चांगलेच महागात पडू शकते. औरंगाबादकडे येणाऱ्या ट्रेनमध्येही (Aurangabad train) असाच प्रकार घडला. मुंबईहून जालन्याकडे येणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसमधील (Jana Shatabdi Express) प्रवाशाने साखळी ओढली अन् ट्रेन थांबली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि रेल्वे थांबवण्याचे कारण तपासले. तेव्हा भजे घेण्यासाठी उतरलेल्या प्रवाशाच्या मदतीसाठी हा प्रकार केल्याचे सांगण्यात आले. हे ऐकून रेल्वे पोलिसांचे टाळकेच सरकले.
मंगळवारी मुंबईहून जालन्याकडे येणारी जनशताब्दी एक्सप्रेस दुपारी 3 वाजेच्या सुमारास इगतपुरी स्टेशनवर थांबली. भूक लागल्यामुळे रेल्वेतील एक प्रवासी भजे घेण्यासाठी खाली उतरला. दरम्यान, रेल्वे सुरु झाली. धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करीत असलेल्या वृद्धाला पाहून सह प्रवाशाने चेन ओढून रेल्वे थांबवली. रेल्वे थांबताच वृद्ध प्रवासी रेल्वेत बसला. त्यानंतर मात्र कुणी चेन ओढळी हे विचारत रेल्वेचे अधिकारी आणि पोलीस D-4 डब्यात शिरले. कुणी चेन ओढली याचा शोध घेण्यात आला. मात्र ज्या व्यक्तीने चेन ओढली होती, त्याने मी प्रामाणिक हेतून चेन ओढली, असे सांगितले. त्यानंतरही अधिकाऱ्यांचा राग शांत झाला नाही.
ज्या व्यक्तीने चेन ओढली त्याच्यावरच पोलीस अधिकारी रागवले. त्यामुळे इतर प्रवाशांनी या घटनेसाठी जे कारणीभूत आहेत, त्यांच्यावर कारवाई करा, असा सल्ला दिला. त्यानंतर रेल्वेतील अधिकाऱ्यांनी त्या वयोवृद्धाकडे मोर्चा वळवला. तुम्ही गुन्हा केलाय, खाली उतरा असे सांगितले. यावर मी दंड भरतो, पण खाली उतरवू नका, अशी विनणी वृद्धाने केली. मात्र नियमावर बोट ठेवत रेल्वे अधिकाऱ्याने त्या वयोवृद्धाला पुढील कारवाईसाठी खाली उतरवले आणि रेल्वे पुढे नेली.
वयोवृद्धाच्या मदतीसाठी रेल्वेची आपत्कालीन सुविधा प्रवाशाने वापरली. मात्र हे प्रकरण त्याच्या चांगेलच अंगलट आले. मदतीच्या भावनेतून हा प्रयत्न केला तर कारवाईला सामोरे जावे लागते. मग ही चेन कशासाठी आहे, असा प्रश्न प्रवाशांनी केला. यावर आता नियम बदलले आहेत. आम्ही आमचे कर्तव्य बजावत आहोत, असे म्हणत रेल्वे अधिकाऱ्यांनी डब्यातून काढता पाय घेतला. त्यामुळे प्रवाशाची, वृद्धाची मदत करण्याची सुविधा या नियमात नसेल तर नियमात नेमकं काय बसतं, असा सवाल प्रवाशांनी केला.
इतर बातम्या-