औरंगाबाद: शहराला शनिवारी पहाटे पुन्हा एकदा मुसळधार (Heavy rain in Aurangabad) पाऊस अन् वीजांच्या कडकडाटाला (Thunderstorm) सुरुवात झाली. शुक्रवारीदेखील शहर तसेच परिसरातील काही भागात पावसानं चांगलंच झोडपून काढलं होतं. पुढील चार दिवस मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज, हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला होता. त्यानुसार शनिवारी पहाटे म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी पहाटेच शहरावर वीजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. कडाडणाऱ्या वीजांच्या आवाजाने सखल भागात राहणाऱ्या नागरिकांची मात्र झोप उडाली. कारण मागील काही दिवसांपासून होणाऱ्या पावसाने शहरातील अनेक वसत्यांमध्ये पाणी शिरत आहे. औरंगाबाद परिसरातील ग्रामीण भागालाही या पावसाचा जोरदार फटका बसला. त्यामुळे आधीच ओला दुष्काळाचा सामना करणाऱ्या पिकांचं आणखी नुकसान झालं आहे. तसेच अनेक ठिकाणी मध्यरात्रीपासूनच वीजपुरवठा खंडित झाला आहे.
02 ऑक्टोबर रोजी पहाटे 03.25 वाजता शहरात हलक्या पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर 03.38 दरम्यान मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर आभाळात एका-मागून एक वीजा कडाडल्याचा आवाज येऊ लागला. त्यामुळे निसर्गाचं आणखी किती भयाण रौद्ररुप पहायला मिळणार, या धास्तीने औरंगाबादकरांची झोप उडाली. पहाटे 03.38 ला सुरु झालेला पाऊस 04.03 वाजेपर्यंत अखंड बरसत होता. या पंचवीस मिनिटात सरासरी 118 मिली प्रति तास या वेगाने पावसाच्या सरी कोसळत होत्या.
शहरातील एमजीएम जेएनईसी वेधशाळेत या पंचवीस मिनीटात 51. 2 मिमी पावसाची नोंद झाली. साडे चार वाजेनंतर पावसाचा जोर कमी झाला. पहाटे 05.35 पर्यंतच्या दोन तासात शहरावर 78.2 मिमी पावसाची नोंद झाली.
गेल्या सोमवारपासून देशात राजस्थानमधुन परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. त्यातच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रिवादळाने 27 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर दरम्यान मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना झोडपून काढले. या चक्रिवादळाचा प्रवास नंतर उत्तर महाराष्ट्रात व गुजरात मार्गे अरबी समुद्रात गेल्याने या गुलाब चक्रिवादळाचे नामकरण शाहीन करण्यात आले, अशी माहिती औरंगाबाद येथील एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्र व क्लबचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली.
इतर बातम्या-
ढगांचा ढोल घुमू लागला… मराठवाड्यात पुन्हा पावसाला सुरुवात, वीजांच्या कडकडाटासह सरी