औरंगाबादः बंगळुरूमध्ये (Bangalore ) खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या एका तरुणीचा पतीशी काडीमोड झालेला आहे. गेल्या काही दिवसांपासून ती औरंगाबादमधील (Aurangabad)एका तरुणाच्या संपर्कात फेसबुकच्या (Facebook Friend) माध्यमातून आली. सुरुवातीला लाइक्सच्या माध्यमातून सुरु झालेली ही मैत्री एवढी घट्ट झाली की ही मैत्रीण त्याला भेटण्यासाठी बंगळुरूहून थेट औरंगाबादेत आली. मात्र बंगळुरूहून निघालेल्या या मुलीचा पाठलाग करत तिचे नातेवाईकही औरंगाबादेत आले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरूहून आलेल्या तरुणीचा तिच्या पतीशी काडीमोड झालेला आहे. तिला एक मुलगी आहे. दरम्यान, ती एका खासगीत कंपनीत नोकरी करते. औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडीतील एका तरुणाशी तिची मैत्री झाली. त्यांच्यातील चॅटिंग वाढल्यावर ते ऑनलाइन प्रेमात पडले. तरुणी चांगल्या हुद्द्यावर काम करते. त्यामुळे तिला पगारही चांगला आहे. तिच्याच पैशांवर मुकुंदवाडीतील तरुणाने वाहन विकत घेतले. त्यांच्यातील मैत्री अधिक घट्ट झाल्यावर ती त्याला भेटायला मुलीला घेऊन थेट बंगळुरूहून औरंगाबादेत आली.
शनिवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास ही तरुणी तरुणाला भेटण्यासाठी बंगळुरूहून औरंगाबादेत आली. तिच्या पाठोपाठ तिचे नातेवाईकही औरंगाबादेत आले. नातेवाईक आपला पाठलाग करत आहेत, हे तिला कळलेच नाहीत. मुकुंदवाडीतील घरात घुसताच तरुणासह तिला नातेवाईकांनी पकडले. त्या तरुणाला आणि तरुणीला नातेवाईकांनी समजवून सांगितले. काही वेळाने दोघांचीही चांगलीच कानउघडणी केली. एवढंच नाही तर दोघांनाही मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. आई व नातेवाईकांनी पोलिसांसमोर टाहो फोडला. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी या तरुण-तरुणींची समजूत काढली. अखेर ही तरुणी नातेवाईकांसोबत बंगळुरूला परतली.
दरम्यान, शहरातील दुसऱ्या एका घटनेत , क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर दहा ते बारा जणांच्या टोळक्याने तरुणाला इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून खाली फेकण्याचा प्रयत्न करत गंभीर मारहाण केली. ही घटना 19 ऑक्टोबर रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास जालना रोडवरील अपना बाजार परिसरात घडली. याप्रकरणी टोळक्याविरुद्ध 23 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. संदेश देवेंद्र गंगवाल (28, रा. राठी संसार, रो-हाऊस, जाधववाडी, सनी सेंटर) असे मारहाणीतील जखमीचे नाव आहे.
संदेश गंगवाल 19 ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास जालना रोडवरील अपना बाजार येथील यमी-यमी चायनीज स्टॉल येथे गेले होते. त्यावेळी गंगवाल व याग्निक पटेल यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला. वादानंतर याग्निक पटेल यांनी आठ ते दहा जणांना बोलावून गंगवाल यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. तसेच कार्यालयातील काचेवर ढकलले. वाद वाढत गेल्यानंतर टोळक्याने त्यांना इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून खाली फेकून देण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने गंगवाल यांनी गॅलरीचे ग्रील पकडून ठेवल्यामुळे त्यांचा जीव वाचला. मारहाणीत त्यांच्या डोक्याला गंभीर जखम होऊन टाके पडले. याप्रकरणी याग्निक पटेल यांच्यासह आठ ते दहा जणांविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपनिरीक्षक राऊत करत आहेत.
मारहाणी दरम्यान टोळक्यातील आरोपींनी गंगवाल यांचा मोबाइल आणि स्मार्ट वॉच हिसकावल्याचे त्यांनी सांगितले. जवाहरनगर पोलिसांनी मोबाइल आणि वॉच गहाळ झाले असे सांगा, हिसकावले असे सांगू नका असे सांगितले होते. गंगवाल यांचा याला विरोध होता. या प्रकरणात काही राजकीय मंडळींनी देखील फोनद्वारे धमकी दिल्याचे गंगवाल यांनी सांगितले. अखेर शनिवारी रात्री पोलिसांचेच म्हणणे खरे करत तसा जबाब नोंदवला गेल्याचे स्पष्ट होत आहे.
जालना राेडवरील घटनेत टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल
इतर बातम्या-