औरंगाबाद: नवरात्र आणि दसऱ्याचा सण संपत नाही, तोच औरंगाबादची ग्राम देवता असलेल्या कर्णपुरा देवीच्या (Karnpura Devi) परिसरातील बालाजी मंदिरातील (Balaji Temple) दानपेट्या चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. या धाडसी चोरीमुळे मंदिर परिसरातील पुजारी आणि रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री दीड वाजेच्या सुमारास कर्णपुरा बालाजी मंदिराच्या जवळ राहणारे अनिल पुजारी यांना जाग आली. मंदिराचे शटर कुणीतरी उघडत असल्याचा आवाज येत होता. तसेच घराबाहेर काही लोक असल्याचे जाणवताच त्यांनी आरडाओरड सुरु केली. त्यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे रहिवासीदेखील जागे झाले. सर्वांनी मंदिराकडे धाव घेतली असता मंदिराच्या समोरील चॅनल गेटचे कुलूपही तोडलेले होते. तर पाठीमागील दुसरा दरवाजादेखील उघडा होता.
या घटनेत बालाजी मंदिरातील 30 ते 35 किलो वजनाची दानपेटी आणि एक लहान दानपेटी अशा दोन दानपेट्या चोरीला गेलेल्या आढळून आले. तसेच बालाजी मंदिरासमोरील हनुमान मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून आले. पूजाऱ्यांनी ही माहिती पोलिसांना देताच छावणी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. शिवाय फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले. यावेळी श्वानपथकही दाखल झाले होते. मात्र पाऊस पडल्याने श्वान पथकाची मदत घेता आली नाही. मंदिराचे पूजारी यांच्या फिर्यादीवरून दुपारपर्यंत छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
नवरात्रीच्या नऊ दिवसात मंदिरातील सर्व पेटीत जमा झालेले पैसे एक दिवस आधीच काढून एका पेटीत मंदिरातच ठेवण्यात आले होते. चोरट्यांनी पळवून नेलेल्या तीन पेट्यांमध्ये फक्त एका दिवसाचे साधारण पन्नास हजारांच्या आसपास दान असावे, असा अंदाज पुजाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच सुदैवाने पैसे भरून ठेवलेल्या मंदिरातील पेटीकडे चोरट्यांचे लक्ष गेले नाही, त्यामुळे ती सुरक्षित असल्याचे मंदिराचे पुजारी अनिल प्रभाकर पुजारी यांनी सांगितले.
कर्णपुरा परिसरात काही लहान मुले खेळत असताना त्यांना दोन ते तीन जणांनी बालाजी मंदिराबाबत विचारणा केली होती. शिवाय मंदिराबाबतची माहितीदेखील विचारली होती. अशी माहिती समोर आली आहे. कर्णपुऱ्यातील बालाजी मंदिरात 16 ते 17 वर्षांपूर्वी अशीच चोरी घडली होती. आता ही चोरीची दुसरी घटना असल्याची माहिती पुजाऱ्यांनी दिली.
इतर बातम्या-
पिशवी आडवी लावून हातचलाखीने मोबाईल लंपास, सांगलीत टोळी जेरबंद
ज्वेलरच्या दुकानातून 20 तोळे सोन्यासह कामगार पसार, कोलकात्यातून दोघांना अटक