औरंगाबाद: शहर आणि ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांची मालिका सुरुच आहे. शहरात विविध ठिकाणी घरफोडी, दुकानाचे शटर उचकटून त्यातील मालाची चोरी अशा घटना घडत आहेत. त्यातच आता उद्योगनगरीतील कंपन्यांनाही चोरांनी लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. वाळूजमधील जैन इलेक्ट्रिकल्स (Jain Electricals ) कंपनीतही चोरी झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात (Waluj)यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला.
वाळूजमधील जैन इलेक्ट्रिकल्स कंपनीत विद्युत ट्रान्सफॉर्मर उत्पादनाचे काम चालते. तसेच महापारेषण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मर दुरूस्तीची कामेही कंपनीद्वारे केली जातात. शुक्रवारी कामकाज संपल्यानंतर उद्योजक आनंद तातेड हे घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी कंपनीचे सुरक्षा अधिकारी मिलिंद शिरसाठ यांना कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या शटरचे कुलूप तुटलेले दिसले. तसेच शटर उचकटलेलेही दिसले. शिरसाठ यांनी ही माहिती कंपनीचे मालक तातेड यांना दिली. तातेड यांनी कंपनीत धाव घेऊन पाहणी केली.
कंपनीचे मालक आनंद तातेड यांनी फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, या चोरीत कंपनीतील 1960 किलो ग्रॅम वजनाचे आणि 4 लाख 95 हजार रुपये किंमतीचे कॉपर पट्ट्याचे 20 नग गायब दिसले. दुरुस्तीसाठी आलेल्या कॉपरपट्ट्याही चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. सोमवारी यासंबंधीची तक्रार त्यांनी वाळूज पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली.
जैन इलेक्ट्रिकल्स कंपनीत झालेली ही चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेच्या दिवशी जवळपास 5 ते 6 चोरटे कंपनीच्या पाठीमागील संरक्षक भिंतीवरून कंपनीत आले. शटर उचकटून आतमध्ये ठेवलेल्या कॉपर पट्ट्यांच्या बॉगिन संरक्षक भिंतीवरून मोकळ्या मैदानात फेकताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहेत. चोरी केल्यानंतर कॉपर चारचाकी वाहनात टाकून चोरटे पसार झाले.
जनावारांची चोरी करून ती कत्तल करण्यासाठी नेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश औरंगाबाद गुन्हे शाखेने केला आहे. या टोळीला सुंदरवाडी पेट्रोल पंपाजवळ ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून सहा जनावरे, एक दुचाकी आणि एक टेम्पो जप्त करण्यात आला.
करमाड येथील शेतकरी मदन कोरडे यांनी शेंद्रा एमआयडीसी परिसरात सहा जनावरे बांधली होती. 27 सप्टेंबर रोजी मध्यरात्री ही जनावरे चोरीला गेली. 28 सप्टेंबर रोजी पहाटे हे लक्षात आल्यावर कोरडे यांनी करमाड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद केली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपासास लागले असता सुंदरवाडीजवळ एका निळ्या रंगाच्या टेम्पोमध्ये साह जनावरे असल्याची माहिती मिळाली. अधिक चौकशी केली असता शेख अमीर शेख सादेक, शेख आसीफ शेख सादेक, रसुलखान अब्दुलखान यांनी मिळून ही चोरी केल्याचे उघड झाले. तसेच जिल्ह्यात आठ ठिकाणी जनावरांची चोरी केल्याची कबूलीही त्यांनी दिली.
इतर बातम्या-