औरंगाबाद: घरफोडी करताना पोलिसांना संशय येऊ नये म्हणून चोराने अजब शक्कल लढवल्याची घटना शहरात उघडकीस आली आहे. आपण गाऊन घातल्यामुळे सीसीटीव्ही फुटेज तपासताना ही कुणी महिलाच आहे, असा पोलिसांचा समज होईल, अशी आशा चोराला होती. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या (Aurangabad Crime Branch Police) नजरेतून चोरट्याची ही अजब शक्कल सुटली नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या घरफोडीतील या चोराला औरंगाबाद पोलिसांनी अखेर जेरबंद केले आहे. नईम ऊर्फ चुन्नू उस्मान शहा (Chunnu Usman Shaha) असे या चोरट्याचे नाव आहे.
हर्सूल परिसरातील कडुबाई बालाजी चाथे यांच्या पतीवर शस्त्रक्रिया होणार असल्याने सहा दिवसांपूर्वी त्या घराला कुलूप लावून रुग्णालयात गेल्या होत्या. तेव्हा चोराने कुलूप तोडून 6 तोळे सोने व इतर ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार नोंदवली होती. तपासानंतर पोलिस नईमपर्यंत पोहोचले. त्यानंतर त्याने एन-1 सिडको, मयूरपार्क, जटवाडा अशा उच्चभ्रू वसाहतींमध्येही याच पद्धतीने घरफोडी केल्याचे तपासात उघड झाले.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण कैद झालोच तर पोलिसांना कळू नये किंवा परिसरातील नागरिकांनाही सुगावा लागू नये, यासाठी चोरी करणाऱ्या नईम ऊर्फ चुन्नू उस्मान शहा याने ही अजब शक्कल लढवली. ज्या घरात चोरी करण्यासाठी जायचे, तिथे तो लेडिज गाऊन आणि त्यावर स्वेटर घालून जात असे. एखादे घर बंद दिसताच तो फोडत होता. मात्र पोलिसांच्या नजरेतून नईमची ही चालाखी सुटली नाही. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक दत्ता शेळके हे याप्रकरणी तपास करत असताना त्यांना नईम अशी विचित्र पद्धत वापरून चोरी करत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
महिलांचा गाऊन घालून नईमने शहरातील विविध वसाहतींमध्ये यापूर्वी घरफोड्या केल्याचे कबूल केले. यात 29 ऑगस्ट रोजी अॅड. खलील अहमग गुलाम (55, रा. एन-1 सिडको) यांचे घरही फोडून त्याने रोख रक्कम आणि दागिने पळवले होते. तसेच मयूरपार्क आणि जटवाड्यातील काही घरांमध्येही त्याने हीच पद्धत वापरून चोरी केल्याचे सांगितले. 37 वर्षीय नईम हा जटवाडा रोडवरील सईदा कॉलनीतील रहिवासी असून त्याने काही वर्षांपूर्वी पहिल्या पत्नीला सोडून देत दुसरा विवाह केला. त्याला एकूण सात मुले आहेत. नईमवर खून आणि मारहाणीचे गुन्हेही दाखल आहेत.
इतर बातम्या-
Aurangabad Crime: जनावरांची चोरी करून धुमाकुळ घालणारी टोळी बैलपोळ्याच्या दिवशी जेरबंद