औरंगाबादः कोणत्याही एटीएममध्ये किंवा इतर ठिकाणी चोरी करणारे चोरटे नेहमी तोंडाला मास्क लावून किंवा संपूर्ण चेहरा झाकूनच चोरी करतात. मात्र बोरगाव बाजार येथील चोराने चेहरा न झाकताच थेट बोरगाव बाजार येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र काही वेळातच सायरन वाजल्याने तो पळून गेला. सीसीटीव्हीत त्याचा स्पष्ट चेहरा दिसल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 24 तासाच्या आता त्याला गजाआड केले.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अफसर गुलाब शहा असे आरोपीचे नाव असून तो नातेवाईकांचा आसरा घेऊन बोरगाव बाजार येथे राहत आहे. त्याच्या राहण्याच्या ठिकाणाहून अवघ्या 20 किमी अंतरावरच त्याने चोरीचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याला ओळखणाऱ्यांची संख्या त्या भागात अधिक निघाली.
सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक नरसिंग लटपटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 18 नोव्हेंबर रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास बोरगाव बाजार येथील बँकेचे एटीएम मशीन चोरट्याने फोडण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी सायरन वाजल्याने त्याने तेथून धूम ठोकली. या प्रकरणी सिल्लोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तत्काळ तपास सुरु केल्याने सीसीटीव्ही फुटेजद्वारे सदर आरोपीची ओळख पटली.
इतर बातम्या-