Aurangabad Top 5: औरंगाबाद शहरामधील महत्त्वाच्या पाच बातम्या, वाचा मोजक्या शब्दात, कमी वेळात!

| Updated on: Sep 22, 2021 | 10:19 AM

औरंगाबादमध्ये रंगलीय 'समृद्धी'च्या बछड्यांच्या बारश्याची चर्चा, औरंगाबाद महापालिकेची करवसुली धीम्या गतीने यासह शहरातील पाच महत्त्वाच्या बातम्या.

Aurangabad Top 5: औरंगाबाद शहरामधील महत्त्वाच्या पाच बातम्या, वाचा मोजक्या शब्दात, कमी वेळात!
Follow us on

1. औरंगाबाद-पुणे रेल्वेमार्गाला नगरमध्येच ब्रेक?

बहुचर्चित औरंगाबाद-पुणे रेल्वेमार्गाची (Aurangabad-Pune Railway) मागणी अनेक दिवसांपासून सामान्यांसह बिझनेसमन वर्गातून होत आहे. औरंगाबाद शहराच्या प्रगतीत मोलाची भर टाकणाऱ्या या रेल्वेमार्गाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनानेही राज्य व केंद्र सरकारकडे सादर केला. मात्र नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Rao Saheb Danve) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackrey) यांनी फक्त औरंगाबाद-अहमदनगर रेल्वेला गती देण्याबाबत घोषणा केल्याने सर्वच जण संभ्रमात आहेत. दिव्य मराठी वृत्तपत्रात प्रकाशित बातमीनुसार, पुण्यापर्यंतच्या रेल्वेचा मुद्दा पुढील बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्याची तयारी शिवसेनेच्या आमदारांनी दर्शवली. तर उद्योजकांनीही सुरुवातीला अहमदनगरपर्यंत काम झाले तरी पुरेसे असल्याचे म्हटले. सध्या अहमदनगरपर्यंत रेल्वे मार्ग झाला तरी शहरातील राजकीय नेते मंडळी पुण्यापर्यंतच्या मार्गापर्यंतची परवानगी मिळवण्यास सक्षम आहेत, असा सूरही यावेळी उमटला.

2. औरंगाबादमध्ये रंगलीय ‘समृद्धी’च्या बछड्यांच्या बारश्याची चर्चा

शहरात सध्या सिद्धार्थ उद्यानातील पाच मादी बछड्यांच्या नामःकरण सोहळ्याची बरीच चर्चा सुरु आहे. कारण महापालिकेने हा सोहळा अनोख्या पद्धतीने साजरा केला. समृद्धी वाघिणीच्या पाच बछड्यांसाठी नावं सूचविण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं होतं. त्यानुसार बछड्यांसाठी सुमारे 200 नावांचा प्रस्ताव आला होता. मंगळवारी खासदार सुप्रिया सुळे शहरात होत्या. त्यांच्या हस्ते या 200 नावांमधून पाच नावांच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. त्यानुसार समृद्धीच्या बछड्यांना नावं देण्यात आली. ही नावं 1) जिजाई (सूचक: रामदास बोराडे) 2) प्रतिभा (सूचक विठ्ठलराव देवकर) 3)वैशाली (सूचक: अथर्व बुकस्वार) 4) रंजना (सूचक; कुसुम दिवाकर) 5) रोहिणी (सूचक: पूर्वा पाटील) अशी आहेत.

3. औरंगाबाद महापालिकेची करवसुली धीम्या गतीने

चालू आर्थिक वर्षात महापालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठी विविध नवे प्रयोग हाती घेतले असले तरीही या मोहिमेला फारसे यश मिळालेले दिसून येत नाही. एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत केवळ पंधरा टक्के कर वसुली झाल्याची माहिती हाती आली आहे. करवसुली अत्यंत कमी झाल्याने महापालिकेच्या एकूण अर्थकारणावर याचा गंभीर परिणाम होत आहे. जी 15 % करवसुली झाली आहे, ती त्यातील बहुतांश कर नागरिकांनी स्वतः भरला आहे. आतापर्यंत महापालिकेची फक्त 14.84 टक्के कर वसुली छजाली आहे. चालू आर्थिक वर्षातील करासह एकूण थकबाकी 468 कोटी 57 लाख रुपये एवढी आहे. एवढी वसूली व्हावी, असे टार्गेट प्रशासनातर्फे देण्यात आले आहे. मात्र आतापर्यंत 69 कोटी 58 लाख रुपयांची करवसुली ढासी आहे. करवसुलीचे प्रमाण वाढण्यासाठी मनपा प्रशासकांनी त्रिभाजनाचा प्रयोग राबवला आहे. आता या प्रयोगालाही किती यश मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

4. कुख्यात गुंड टिप्या येवल्यातूनही निसटला

औरंगाबाद शहरात दोन दिवसांपूर्वी शिवाजीनगर भाजी मंडईत एका महिलेसह पोलिसाच्या अंगावर गाडी घालत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटनेने संपूर्ण औरंगाबादला हादरा दिला होता. त्यामुळे टिप्याच्या गुन्ह्यांना फारसे गांभीर्याने न घेणाऱ्या पोलिसांचेही धाबे दणाणले होते. त्याच्या शोधात पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे एक आणि गुन्हे शाखेची दोन पथके शहरात फिरत आहेत. दोन दिवसांपूर्वी तो येवल्याच्या नातेवाईकांच्या घरी असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने छापा टाकला. मात्र पोलीस येण्यापूर्वीच तो पसार झाला होता. अल्पवयीन असल्यापासून गुन्हेगारी क्षेत्रात असलेला टिप्या यापूर्वी पोलिसांना गुन्हेगारांची खबर देत होता. मात्र त्याचाच गैरफायदा घेत तो आता अट्टल गुन्हेगार झाला आहे. त्याच्यावर चारपेक्षा जास्त खून, अनेक विनयभंग, लूटमार, जबरी चोरी, खंडणी, व्यापाऱ्यांना धमकावणे, खुनाचा प्रयत्न आदी गुन्हे आहेत.

5. डेंग्यूच्या नव्या स्ट्रेनमुळे आरोग्ययंत्रणेचे धाबे दणाणले

सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या बातमीने तर आरोग्ययंत्रणा खडबडून जागी झाली आहे. देशातील 11 राज्यांमधये डेंग्यूचा नवीन स्ट्रेन अधिक धोकादायक ठरू शकतो, असा इशारा केंद्राच्या अधिकाऱ्यांना दिला. यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. सप्टेंबर महिन्यात शहरातील डेंग्यूच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. मागील 20 दिवसांत संशयित 68 पॉझिटिव्ह 46 रुग्ण सापडले. मागील दोन वर्षांपासून आरोग्य यंत्रणा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कामात लागली असताना आता डेंग्यूनेही डोके वर काढले आहे, त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर आता नवे आव्हान आहे.

इतर बातम्या- 

आधी बेस्ट फ्रेंडची रिक्वेस्ट, मग अश्लील व्हिडिओ अन् चॅटिंग, अखेर औरंगाबाद पोलिसांच्या जाळ्यात अडकला

औरंगाबाद महापालिका देतेय QR कोड आधारीत कोव्हिड चाचणी अहवाल, वर्षभरातील 5 लाखांपेक्षा जास्त अहवाल उपलब्ध