औरंगाबादः एसटी महामंडळाच्या (ST Strike) कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गेल्या महिनाभरापासून बंद असलेली अजिंठा लेणीतील (Ajanta caves) बससेवा अखेर बुधवारपासून सुरु करण्यात आली आहे. बुधवारी सोयगावा आगाराने 6 बस आणि 10 कर्मचारी लेणी परिसरात तैनात केले. फर्दापूर टी पॉइंट ते अजिंठा लेणी या दरम्यानची वाहतूक आता बसमुळे सुरुळीत झाली आहे. यामुळे अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची मोठी सोय झाली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी शासनात विलीनीकरणाऱ्या मागणीमुळे गेल्या महिनाभरापासून संप पुकारला आहे. त्यामुळे 30 पेक्षा जास्त दिवसापासून अजिंठा लेणीतील बससेवा बंद झाली होती. यामुळे पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागला. दरवर्षी या काळात सोयगाव आगाराला अजिंठा लेणीतून रोज जवळपास दोन लाख रुपयांचा महसूल प्राप्त होतो. मात्र यंदा संपामुळे 72 लाख रुपयांचा फटका बसला आहे.
सोयगाव आगारात आता लेणीपर्यंत बससेवा सुरळीत केली आहे. बुधवारी संपातील काही वाहक, चालक कामावर रूजू झाले. त्यामुळे पर्यटकांच्या सोयीसाठी आता 6 बसेस, 3 वाहक, 6 चालक आणि एक वाहतूक नियंत्रक असे एकूण 10 कर्मचारी तैनात केले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा प्रश्न हळू हळू सुटताना दिसत आहे. तसेच वातावरणात होत असलेले बदलही चांगले आहेत. औरंगाबाद आणि परिसरात आरोग्यदायी हिवाळ्याचे वातावरण असून आगामी काळात पर्यटकांची संख्याही वाढेल, अशी अपेक्षा आहे.
इतर बातम्या-