औरंगाबादः 2015 मध्ये ट्रू जेट कंपनीने औरंगाबाद ते हैदराबाद, अहमदाबाद अशा विमानसेवा सुरु केल्या होत्या. मात्र कोरोनामुळे मार्च 2020 पासून हैदराबाद आणि अहमदाबाद विमान सेवा (Flight Service) बंद करण्यात आली आहे. विमानतळावरील जागा आणि दोन्ही हवाई मार्ग अजूनही या कंपनीकडे आहेत. यासह चिकलठाणा विमानतळ प्राधिकरणाचे (Aviation Authority) 5 लाखांचे शुल्क प्रलंबित आहे. त्यामुळे विमानतळ प्राधिकरण कंपनीला आता नोटीस दिली जाणार आहे. कंपनीने सेवा पुन्हा सुरु केली तर प्रवाशांसाठी ते सोयीचे ठरेल. अन्य़था दोन्ही हवाई मार्ग मोकळे होतील, अशी शक्यता आहे.
चिकलठाणा विमानतळावरून 2015 मध्ये ट्रू जेटने औरंगाबाद- हैदराबाद तिरुपती विमानसेवा सुरु केली होती. औरंगाबाद- हैदराबाद प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त प्रमाणात असते. तसेच दक्षिण भारतीयांना शिर्डीला जाण्यासाठी ही विमानसेवा सोयीची पडत होती. यापूर्वी अनेक वर्षे औरंगाबादहून हैदराबादला फक्त रस्ते आणि रेल्वे मार्गानेच जाता येत होते. ट्रू जेटने विमानसेवा सुरु केल्यानंतर औरंगाबादेतून हैदराबाद गाठणे शक्य झाले होते.
दरम्यान, कंपनीने 2019 मध्ये अहमदाबादसाठी विमानसेवा सुरु केली होती. या दोन्ही सेवा मार्च 2020 पासून बंद आहेत. ट्रू जेटने औरंगाबादहून विमानसेवा कायमची बंद करत असल्याचे अद्याप जाहीर केले नाही. प्राधिकरणाचे आतापर्यंतचे 5 लाख रुपये थकवले आहेत. त्यामुळे कंपनीला आता नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
इतर बातम्या-