औरंगाबादः वेरूळ-दौलताबाद या जागतिक पर्यटनस्थळांच्या दिशेने जाणाऱ्या नगर नाका ते शरणापूर या विना दुभाजकाच्या दुपदरी रस्त्याने आतापर्यंत शेकडो जणांचा बळी घेतला आहे. आता ऐन दिवाळीत येथे आणखी एक अपघात झाला असून या घटनेत दोघांचा गंभीर मृत्यू झाला आहे. मिटमिट्यातील फौजी धाब्यासमोर विरुद्ध दिशेने आलेल्या वाळूच्या हायवाने दोन दुचाकीस्वारांचा बळी घेतला आहे.
नगरनाका ते शरणापूर असा हा रस्ता जवळपास, 80 फूट रुंद आहे. या रस्त्यात कुठेही दुभाजक टाकलेले नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढत आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर आणखी एक अपघात होऊन यात दोघांचा बळी गेला आहे. या रस्त्यावर आता आणखी किती बळी गेल्यावर प्रशासन इथे दुभाजक लावेल, असा संतप्त प्रश्न परिसरातील नागरिक करत आहेत.
सोमवारी मिटमिटा रस्त्यावर झालेल्या अपघातात दोन कुटुंबावर काळानं घाव घातला. वाळुच्या हायवाने दुचाकीस्वार दोघांचा बळी घेतला. सोमवारी माळीवाड्याच्या दिशेने वाळुचा हायवा वुरुद्ध दिशेने जात होता. याचवेळी माळीवाड्याकडून दुचाकीने सेवानिवृत्त शिक्षक कमलाकर ज्ञानेश्वर दैठणकर आणि सुरेश पांडुरंग खंडागळे हे छावणीच्या दिशेने येत होते. तेवढ्यात त्यांच्या दुचाकीला विरुद्ध दिशेने आलेल्या हायवाने जबरदस्त धडक दिली. दैठणकर हे पंधरा फूट फरफटत गेले. त्यासोबत भरधाव वेगाने येणाऱ्या हायवाने चरण वाघमारे यांच्या दुचाकीलाही ठोकरले. यात वाघमारेदेखील गंभीर जखमी झाले आहेत. अपघात होताच हायवा चालकाने वाहनातून पळ काढला. वाघमारे यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
यातील एक दैठणकर हे सरस्वती भवन शाळेत शिक्षक होते. दोन-तीन वर्षांपूर्वीच ते सेवानिवृत्त झाले होते. गेल्या 40 वर्षांपासून ते शिवशंकर कॉलनीत वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात मुलगा विवाहित मुली आणि पत्नी असा परिवार आहे. तर दुसरे मयत खंडागळे हे मुळचे जालन्यातील मंठा तुलक्यातील कटाळा खुर्द येथील रहिवासी होते. दहा वर्षांपूर्वी ते शहरात आले होते. गारखेडा परिसरात भाजीपाला विक्री करून ते कुटुंबियांचा उदरनिर्वाह करायचे. त्यांच्या पश्चात मुलगा, एक विवाहित तर दुसरी अविवाहित मुलगी असून पत्नी घरकाम करते.
शहरातून वेरूळ, दौलताबादचा किल्ला, खुलताबाद, म्हैसमाळ, शुलीभंजन या पर्यटन स्थळांकडे जाणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर पर्यटकांना अखंड ओघ सुरु असतो. औरंगाबादहून या पर्यटन स्थळांकडे जाण्यासाठी नगर नाका ते शरणापूर-दौलताबाद टी पॉइंट हा एकमेव रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. अपघाताचा प्रमाण वाढत असल्याने हा रस्ता आता चौपदरी करण्याची मागणी जोर धरत आहे.
इतर बातम्या-