औरंगाबाद: जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात (Aurangabad- Jalna District) घरफोड्या करणाऱ्या दोघांना औरंगाबादमध्ये काल पोलिसांनी बेड्या ठोकल्या. औरंगाबाद ग्रामीणच्या 14 पोलिस ठाण्यांच्या हद्दीत धुमाकूळ घालत वर्षभरात 28 घरफोड्या करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने 19 ऑक्टोबर रोजी जालना जिल्ह्यातील भोकरदनमधून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून 3 लाख 63 हजार 43 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. संजय मारोती शिंदे (30, रा. नांजेपाटी, भोकरदन), रामा अण्णा पवार (26, रा. पुखराजनगर, भोकरदन) अशी आरोपींची नावे असून त्यांचे 4 साथीदार फरार आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत दिली. या दोघांविरुद्ध जालना जिल्ह्यात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे सूत्रांनी सांगितले.
चौकशीत अन्य 4 साथीदारांसह घरफोड्या केल्याची कबुली त्यांनी दिली. दोघांच्या ताब्यातून रोख 14 हजार, 3 लाख 30 हजार 43 रुपये किमतीचे दागिने, दोन मोबाइल आणि घरफोडीत वापरलेले लोखंडी कटर, छोटी लोखंडी पहार असा एकूण 3 लाख 63 हजार 43 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कामगिरी पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस, उपनिरीक्षक विजय जाधव, प्रदीप दुबे, नामदेव सिरसाठ यांनी केली.
याप्रकरणी काकासाहेब चव्हाण (रा. किनगाव, ता. फुलंब्री) यांनी फुलंब्री ठाण्यात तक्रार दिली होती. 10 ऑक्टोबरच्या मध्यरात्री चोरट्यांनी चव्हाण यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याची पोत, नेकलेस, मंगळसूत्र व चांदीची चेन तसेच त्याच गावातील दत्तात्रय चव्हाण, देवनाथ सोनवणे, जिजाराम चव्हाण यांचे देखील घर फोडून दागिने व रोख असा एकूण 99 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस तपास करत असताना घरफोडीचे गुन्हे संजय शिंदे, रामा पवार यांनी अन्य साथीदारांसह केल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून पोलिसांनी त्यांना भोकरदनमधून ताब्यात घेतले.
औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद हद्दीत 6, गंगापूर 4, पिशोर 2, फुलंब्री 2, वडोदबाजार 2, चिकलठाणा2, देवगाव रंगारी2, करमाड 2, कन्नड, सिल्लोड, पैठण, वैजापूर, शिऊर, सोयगाव या ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी1 असे एकूण 28 घरफोडी गुन्हे केल्याची कबुली त्यांनी दिली. या टोळीत आणखी सहभागी आहेत. त्यांचा तपास पोलीस घेत आहे.
इतर बातम्या-
लसींचे 95 हजार डोस शिल्लक, नागरिकांनी पुढे येण्याची गरज, जनजागृतीसाठी औरंगाबाद मनपाचे व्यापक प्रयत्न