औरंगाबाद: गुलाब चक्रिवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या मराठवाड्यात चांगलाच हाहाकार माजला आहे. औरंगाबादच्या ग्रामीण भागातही पावसाचे थैमान (Heavy rain in Aurangabad) माजले आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर सुरु झालेल्या या पावसाने फुलंब्री, कन्नड, सोयगाव, पैठण आदी भागाचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी उभी पिकं वाहून गेली. तर अनेक घरे, दुकाने यांचे नुकसान झाले आहे. गंगापूर तालुक्यातील (Gangapur in Aurangabad) नागझरी नदीला (Nagzari flood) महापूर असून धमोरी गावाला याचा फटका बसला आहे.
गंगापूर तालुक्यातील धमोरी गावातही पूराचा फटका बसला. कालपासून झालेल्या मुसळधार पावसाने नागझरी नदीला पूर आला आहे. या पुरातून गावाकडे परतण्यासाठी दोघे शेतकरी हे पात्र पार करत होते. मात्र पाण्याचा प्रवाह एवढा अफाट आणि वेगवान होता की या दोघांना त्यात तग धरणे मुश्कील झाले. अर्धी नदी पार केल्यानंतर काहीच अंतर शिल्लक असताना पाण्याच्या वेगासोबत हे दोघे शेतकरी वाहून गेले. दोन शेतकरी वाहून जातानाचा व्हिडीओ कॅमेऱ्यात झाला कैद झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातही सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. उस्मानाबाद आणि कळंब तालुक्यात अवघ्या काही तासांत 100 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे मांजरा आणि तेरणा धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. लोकांनी नदी आणि धरणाच्या पाण्यात उतरु नये असं आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केलंय. उस्मानाबाद तालुक्यातील तेर गाव पूर्णपणे पाण्यात बुडाले आहे. तेरणा धरणाचं पाणी शिरल्यानं गावात सर्वत्र 3 फूट पाणी साचलंय. तेर ग्रामीण रुग्णालयातही पाणी शिरल्यानं रुग्णांचे मोठे हाल झाले. तेर ग्रामीण रुग्णालय, तसंच कळंब तालुक्यातील वाकडेवाडी आणि सौंदना गावात 27 जण अडकले होते. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेनं त्यांची सुखरुप सुटका केलीय. उस्मानाबाद जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यानं सोयाबीन पिकासह शेती अक्षरश: खरवडून गेली आहे. त्यामुळे बळीराजावर मोठ्या संकटात सापडला आहे.
बीड जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झालाय. केज, माजलगाव, गेवराई, परळी तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेले आहेत. अंबाजोगाई तालुक्यातील आपेगावसह चार गावं पाण्यात गेली आहे. अनेक नागरिक पुराच्या पाण्यात अडकून पडले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफला पाचारण करण्यात आलं. सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसानं परळी तालुक्यालाही झोडपून काढलं आहे. नागापूरमधील वाण नदीला पूर अलाय. त्यामुळे परळी-बीड मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला. तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे.
इतर बातम्या-
PHOTO: महापालिकेतच पावसाचा धिंगाणा, पार्किंगमध्ये झाड पडलं, स्मार्ट सिटी औरंगाबादची पुरती दाणादाण