सागर सुरवासे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, लातूर | 7 मार्च 2024 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अमित शाह दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रात आले होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला केला होता. त्यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अमित शाह हे शेपूट घालणारे गृहमंत्री आहेत, अशी जोरदार टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. हिंमत असेल तर अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरला जावं, असं आव्हानच उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिलं आहे.
उद्धव ठाकरे दोन दिवसाच्या धाराशिव आणि लातूरच्या दौऱ्यावर आहेत. आज ते लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात होते. यावेळी एका सभेला संबोधित करताना त्यांनी अमित शाह यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला. अमित शाह महाराष्ट्रात आले होते. मणिपूर पेटलं तिथं जायची त्यांची हिंमत झाली नाही. तिथे शेपूट घातलं आणि महाराष्ट्रात येत आहेत. फणा काढत आहेत. हा नागोबा. काश्मीरमध्ये जायची त्यांची हिंमत नाही. अरुणाचलमध्ये चीन घुसलंय तिथे जात नाही. तिथेही शेपूट घातलंय. असा हा शेपूट घाल्या गृहमंत्री महाराष्ट्रात आला आणि आमच्यावर फणा काढून गेला. माझ्यावर काय बोलले त्याचा मी नंतरच्या सभेत समाचार घेईल. पण त्यांची या राज्यांमध्ये जायची हिंमत होत नाही, असा हल्लाच उद्धव ठाकरे यांनी चढवला.
यावेळी त्यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. महाराष्ट्रात मोदींचं नाणं चालूच शकत नाही. हे लक्षात आल्यावर त्यांनी शिवसेना फोडली. बाळासाहेबांचे फोटो लावत आहेत. मी मिंध्यांना भाजपलाही आव्हान देतो, स्वत:च्या वडिलांचे फोटो लावून जिंका ना? स्वत:च्या वडिलांवर आत्मविश्वास नाही का? माझे वडील का चोरता?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
मुख्यमंत्री नाहीत, पण मुख्यमंत्री असल्यासारखेच फिरतात असं ते म्हणाले. बरोबर आहे. मी मुख्यमंत्री नाही. कारण मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रिकाम्या खुर्च्या असतात. माझ्या सभांना प्रचंड गर्दी असते. त्यामुळे मी मुख्यमंत्री नाहीये हे मला माहीत आहे. उरणला संध्याकाळी सभा होती. त्या सभेत लोकांना थंडी वाजत होती. आज इथे घामाच्या धारा वाहत आहेत. थंडीतही गर्दी होती आणि लाही लाही करणाऱ्या उन्हातही गर्दी आहे. याचाच अर्थ संपूर्ण महाराष्ट्र चवताळलेला आहे. निवडणुकीची वाट पाहत आहे, असं ते म्हणाले.