औरंगाबादः पुढील काही महिन्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची पार्श्वभूमी लक्षात घेता राज्यभरात लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी विशेष मोहीम (Special Vaccination mission) हाती घेतण्यात आली आहे. याकरिता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी ‘मिशन कवचकुंडल’ या विशेष मोहिमेची गुरुवारी घोषणा केली. या मोहिमेअंतर्गत 8 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत लसीकरणावर विशेष भर देण्यात येणार आहे. औरंगाबादनेही (Aurangabad municipal corporation)या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला असून शहरात याकरिता अतिरिक्त 20 लसीकरण केंद्र वाढवण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा (Dr. Paras Mandlecha) यांनी दिली.
शुक्रवार म्हणजेच 08 ऑक्टोबर पासून शहरातील लसीकरणाचा वेग दुप्पट ठेवण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. शहरातील 13 खासगी रुग्णालयांत कोव्हिडिशील्डचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार असल्याचेही सांगण्यात आले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी रात्री व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महापालिका आरोग्य अधिकारी यांची बैठक घेतली. ज्या केंद्रावर पुरेसे डॉक्टर, कर्मचारी आहेत तसेच जेथे अधिकचे लसीकरण करणे शक्य आहे, अशा केंद्रांवर दुप्पट लसीकरण कसे करता येईल, याचेही नियोजन केले जाईल. शहरात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली त्या वेळी शंभरपेक्षा अधिक केंद्रे होती. मात्र आता फक्त 45 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. ही संख्या वाढवून 65 केली जाईल, अशी माहिती डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.
मिशन कवच कुंडल अंतर्गत मनपाने काही खासगी रुग्णालयांमधून मोफत लसीकरण करण्याचे ठरवले आहे. यात शहरातील 13 रुग्णालयांचा समावेश आहे. शुक्रवारपासून धूत, सिग्मा, दरक हॉस्पिटल, कमलनयन बजाज, एशियन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, एमाआयटी हॉस्पिटल सिडको, हेडगेवार हॉस्पिटल, मेडिकव्हर हॉस्पिटल चिश्तिया चौक, दहिफळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अदालत रोड, स्वर्णिम हॉस्पिटल कांचनवाडी, इंडोवर्ल्ड चौधरी कॉलनी चिकलठाणा, ग्लोबल हॉस्पिटल सिल्कमिल्क कॉलनी, सोडाणी हॉस्पिटल एन-3 सिडको या खासगी रुग्णालयांतही शुक्रवारपासून मोफत कोविशील्ड लस मिळणार आहे.
शहरात आजवर लसीचे 8 लाख डोस देण्यात आले आहेत. यात 5 लाख 63 हजार 438 नागरिकांनी पहिला तर 3 लाख 12 हजार 883 नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. मनपाला शहरासाठी 11 लाख 77 हजार नागरिकांच्या लसीकरण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
शहरातील लसीकरण वाढवण्यासाठी महापालिकेकडे डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. ठवड्याभरापूर्वीच डॉक्टर्स, व्हॅक्सिनेटर्सची मागणी करत शहरातील अनेक वैद्यकीय महाविद्यालयांना पत्र पाठवले होते. औरंगाबाद मनपाने घाटी रुग्णालयाकडेही लसीकरणासाठी डॉक्टर, व्हॅक्सिनेटर्सची मागणी केली होती. सध्या पालिकेला 20 डॉक्टर्स, 20 व्हॅक्सिनेटर्स तसेच 15 डाटा एंट्री ऑपरेटर्सची आवश्यकता आहे. काही कंत्राटी डॉक्टरांचा आणि कर्मचाऱ्यांना मानधन मिळण्यासाठी सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे आता मनपाला डॉक्टर मिळण्यासाठी अडचणी येत आहेत.
इतर बातम्या-
Aurangabad Alert : नगरमध्ये एकूण 68 गावांत लॉकडाऊन,औरंगाबादेत येणाऱ्या प्रत्येक बसची तपासणी
औरंगाबाद मनपा निवडणूक: 38 प्रभागांचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश, यंत्रणा लागली कामाला