दत्ता कानवटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, संभाजीनगर | 26 डिसेंबर 2023 : महाविकास आघाडीने जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवल्याच्या बातम्या येत आहेत. या फॉर्म्युल्यानुसार ठाकरे गटाला 20, शरद पवार गटाला 10 आणि काँग्रेसला 16 जागा सोडण्यात आल्या आहेत. तर वंचित बहुजन आघाडीला दोन जागा सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत सर्व काही अलबेल असल्याचं बोललं जात आहे. मात्र, असं असतानाच वंचित बहुजन आघाडीने स्वत:चा जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगून महाविकास आघाडीला नवंच टेन्शन दिलं आहे. वंचितच्या या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरून महाविकास आघाडीत धुसफूस वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वंचित बहुजन आघाडीची आज संभाजीनगरात बैठक पार पडली. यावेळी लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. तसेच उमेदवारांचीही चाचपणी करण्यात आली. त्यानंतर वंचित आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रेखा ठाकूर यांनी मीडियाशी संवाद साधला. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस आणि वंचित आघाडी एकत्र येणार आहे. राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. त्यामुळे जागा वाटप करताना समान विभागणी व्हावी. प्रत्येक पक्षाला 12 जागा मिळायला हव्यात, असं रेखा ठाकूर यांनी म्हटलं आहे. वंचितच्या या नव्या फॉर्म्युल्यामुळे महाविकास आघाडीची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
12 सीटच्या फॉर्म्युल्यात किमान तीन उमेदवार मुस्लिम असायला हवेत. उरलेल्या 9 जागांमध्ये ओबीसी, व्हिजे एनटी उमेदवार देण्यात येणार आहे. सर्वांनी एकत्र येऊन लढल पाहजे. गांभीर्य लक्षात घेऊन निर्णय घेऊन लढणार आहोत.12 जागा कोणत्या लढवायच्या ते अजून ठरलेलं नाही. पण ज्या जागा मिळतील त्यात वंचित समूहाला संधी देऊ, असं त्या म्हणाल्या.
राज्यात दोन पक्षात फूट पडली आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष कमकुवत झाले आहेत. मागच्या निवडणुकीचे गणित पाहता वंचितकडे मते आहेत. गेल्या पाच वर्षात आमचा जनाधार वाढला आहे. येत्या 2024मध्ये नरेंद्र मोदी यांना पराभूत करणे हाच आमचा अजेंडा आहे. सध्यातरी कोणत्याही पक्षाचा स्वबळावर पंतप्रधान होऊ शकत नाही. त्यामुळेच निवडणुकीसाठी कालमर्यादेत निर्णय घेणे गरजेचे आहे, असं ठाकूर म्हणाल्या.
उरलेले तीन राजकीय पक्ष सवर्णांचे आहेत. त्यामुळे संविधानात बदल झाला तर त्यांना फार फरक पडणार नाही. पण संविधानात बदल झाल्यास वंचित समूहाला मोठा फरक पडेल. त्यामुळेच संविधान वाचवणं गरजेचं आहे. संविधान सुरक्षित ठेवण्याची गरज आहे, असं त्यांनी सांगितलं.