Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांना गावबंदी, गावकऱ्यांनी अक्षरश: हुसकावून लावलं; कारण काय?

| Updated on: Oct 23, 2023 | 9:45 AM

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांना गावकऱ्यांनी गावात येण्यापासून रोखलं आहे. गावकऱ्यांनी अब्दुल सत्तार चले जावच्या घोषणा देत त्यांना हुसकावून लावलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांना गावबंदी, गावकऱ्यांनी अक्षरश: हुसकावून लावलं; कारण काय?
Abdul Sattar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

दत्ता कानवटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, संभाजीनगर | 23 ऑक्टोबर 2023 : मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रचंड आक्रमक झाले आहेत. त्यांनी आरक्षणासाठी थेट सरकारलाच धारेवर धरलं आहे. जरांगे यांनी जालन्यातील अंतरवली सराटीत राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी केली आहे. तसेच मराठा समाजानेही गावागावात नेत्यांना प्रवेशबंदी केली आहे. आतापर्यंत राज्यातील 500 हून अधिक गावात पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. त्याचा फटका अनेक पुढाऱ्यांना बसला आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनाही गावबंदी करण्यात आली आहे. पण ही गावबंदी मराठा आरक्षणासाठी झाली नाही. तर वेगळ्याच कारणासाठी झाली आहे. गावकऱ्यांनी सत्तार यांना अक्षरश: गावातून हुसकावून लावले आहे.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार हे सिल्लोड तालुक्यातील बोरगाव सावरणी येथे आले होते. गावातील रहिवाशांना दसरा मेळाव्याचं निमंत्रण देण्यासाठी ते आले होते. सोबत त्यांनी मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकाही आणल्या होत्या. सत्तार यांचा ताफा गावात येताच संपूर्ण गाव जमा झाला. पोरांनी हुल्लडबाजी करण्यास सुरुवात केली. गावकऱ्यांनी ‘अब्दुल सत्तार चले जाव’च्या घोषणा दिल्या. काही पोरं तर वाहनांच्यामागे धावत होते. गावकऱ्यांचं हे उग्र रुप पाहून अब्दुल सत्तार यांनी गावातून काढता पाय घेतला.

विशेष म्हणजे सत्तार यांच्या ताफ्यात पोलिसांची व्हॅन होती. पोलिसांनीही या जमावाला रोखलं नाही. गावकऱ्यांना मोठ्या संख्येने जमलेलं पाहून सत्तार यांचा ताफा आला तसा सुसाट वेगाने गावातून निघून गेला. सत्तार गेल्यानंतरही गावकरी गावाच्या वेशीवर थांबूनच होते. सत्तार यांना गावात येऊच द्यायचं नाही, असा चंगच या गावकऱ्यांनी बांधला होता.

गावबंदीचं कारण काय?

या गावातील लोकांनी सत्तार यांना गावात येऊ दिलं नाही. चले जावच्या घोषणा दिल्या. त्यांना अक्षरश: पिटाळून लावलं. त्याला कारणही तसंच घडलं आहे. या गावात काही दिवसांपूर्वी दोन मुस्लिम महिलांचा मृत्यू झाला होता. या महिलांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. याप्रकरणात सत्तार यांच्या राजकीय दबावामुळे पारदर्शक चौकशी होत नसल्याचा काही ग्रामस्थांचा आरोप आहे. त्या रागातून सत्तारांना गावात येण्यापासू रोखण्यात आल्याचं सांगितलं जातं.

तर, काही ग्रामस्थांच्या मते या महिलांच्या मृत्यूप्रकरणात सत्तार यांनी लक्ष घातलं नाही. गावकऱ्यांनी पोलिसांकडे या प्रकरणाचा निष्पक्षपणे तपास करण्याची मागणी केली होती. तसेच या प्रकरणाचं सत्य बाहेर आणण्याचीही विनंती केली. पण पोलिसांनी दखल घेतली नाही. सत्तार यांनीही लक्ष दिलं नाही. त्यामुळेच सत्तार यांना पिटाळून लावल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, अब्दुल सत्तार यांना गावात येण्यापासून रोखण्यात आल्याची चर्चा संपूर्ण सिल्लोड तालुक्यात पसरली आहे. सोशल मीडियावरूनही सत्तार यांना गावातून हुसकावून लावल्याचीच चर्चा होत आहे.