औरंगाबाद: शहर आणि परिसरात रविवारी पावसाची दमदार हजेरी लागली. शहरातील काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम पावसाच्या सरी कोसळल्या. दुपारी 12 वाजेनंतर औरंगाबाद शहरात (Rain in Aurangabad) पावसाची सुरुवात झाल्याने महालक्ष्मीच्या सणासाठी खरेदी करणाऱ्या नागरिकांची काहीशी तारांबळ उडाली. तसेच शहरातील विविध केंद्रांवर नीट परीक्षेसाठी आलेले विद्यार्थी आणि त्यांना सोडण्यासाठी आलेल्या पालकांना पावसामुळे काही काळ त्रास सहन करावा लागला
वैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा अर्थात ‘नीट’ (NEET) साठी शहरात 43 केंद्रांवर विद्यार्थी आले होते. रविवारी दुपारी दोन ते पाच पर्यंत ही परीक्षा होती. मात्र विद्यार्थ्यांना सकाळी 11 वाजेपासून दीड वाजेपर्यंत केंद्रात प्रवेश देण्यात आले. यासाठी बुलडाणा, बीड जालना, परभणीसह विविध जिल्ह्यांतून शहरात आलेले पालक आणि विद्यार्थ्यांना पावसामुळे काही काळ त्रास सहन करावा लागला.
रविवारी दुपारी सुरु झालेला पाऊस, घाटी, मिलकॉर्नर, रेल्वे स्टेशन, गारखेडा, सिडको, हडको परिसरात जवळपास अर्धा तास जोरदार बरसत होता. काही मिनिटांच्या पावसाने ज्युबली पार्ट, रेल्वेस्टेशन परिसरासह अनेक रस्त्यांवर पाणी साचले. उल्का नगरी परिसरातील चेतक घोटा चौकाला पाण्याचा वेढा बसला. त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली. एमजीएम गांधेली वेधशाळेत संध्याकाळपर्यंत 5.1 मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिली. चिकलठाणा वेधशाळेत दुपारी 2.30 वाजेपर्यंत 16.2 मिमी पावसाची नोंद झाली.
प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्या वतीनं जारी केलेल्या माहितीनुसार, 13 सप्टेंबर रोजी जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. म्हणजेच हवामानातील बदलांनुसार येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या दिवशी औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद आणि लातूरमध्ये मात्र हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज आहे.
औरंगाबाद आणि परिसरातील पावसाचा जोर दोन दिवसांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 14 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागानं रत्नागिरी, पुणे, रायगड जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट दिला असून तिथं मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, दुसरीकडे सातारा, ठाणे, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग, अमरावीत, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा गोंदिया जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या-