औरंगाबादः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जसा अति प्रमाणात पाऊस अनुभवायला मिळाला. त्याचप्रमाणे हिवाळा संपताना अतिथंडीची (Cold wave) लाटही नागरिकांना अनुभवायला मिळतेय. मागील चार दिवसांपासून शहराचे किमान तापमान 8.8 ते 8.1 अंश एवढ्या नीचांकी पातळीवर घसरले आहे. यंदाच्या मोसमातले आजपासूनचे मागील सलग चार दिवस अतिथंड राहिले आहेत, अशी नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे. सरासरीपेक्षा 5 अंशांपर्यंत दिवस-रात्रीचे तापमान घसरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील दोन आठवडे शहरातील हवेत प्रचंड बदल जाणवत होते. आता हवामान स्वच्छ (Climate) असून गारठा मात्र मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. पुढचे काही दिवस शहर आणि जिल्ह्यात ही अतिशंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज (Weather Alert) हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
मागील आठवड्यात हवामान बदलामुळे थंडीसोबतच ढगांची गर्दी, पाऊसही पडला. त्यामुळे तापमानातही कमालीचा चढ-उतार पहायला मिळाला. तसेच चार दिवसांपूर्वी पश्चिम किनाऱ्यावरील धुळीच्या वादळाने कोकण ते गुजरातपर्यंतचा पट्टा झाकोळून गेला होता. दुसरीकडे उत्तर भारतात हिमवृष्टी सुरु आहे. तिकडील अतिशीत वारे खेचून आणण्यासाठी आपल्याकडे पोषक वातावरण तयार झाल्याने तीव्र थंडीची लाट दाखल झाली आहे. त्यामुळे यंदाच्या मौसमात पहिल्यांदाच औरंगाबाद शहराचे तापमान सलग चार दिवसांपासून 9 अंशांच्या खाली पोहोचले आहे.
कडाक्याच्या थंडीमुळे औरंगाबादेतील रस्त्यांवर सकाळी 9 वाजेपर्यंत फार गर्दी दिसत नाहीये. तसेच संध्याकाळीही आठ वाजेनंतर अचानक गर्दी कमी होत आहे. थंडीपासून बचावासाठी लोक रस्त्याच्या कडेला शेकोट्या पेटवत आहेत. सर्दी, खोकला, ताप, दम्याचे रुग्णही वाढले आहेत.
शहर आणि जिल्ह्यातील थंडीची लाट अजून काही दिवस कायम राहणार आहे. थंडीपासून बचावासाठी पोषक आहाराचे सेवन करावे. काम असेल तरच थंडीच्या कडाक्यात बाहेर पडावे. गरम कपड्यांचा वापर करावा. फळपिकांचे संरक्षण करण्यासाठी रात्री पाणी द्यावे. गोवऱ्या पेटवून धूर करावा. पशुधन शेडमध्ये किंवा गोठ्यात बांधावे. शेडला बारदान लावावे, जास्त तापमानाचे बल्ब सुरु ठेवावे, असे आवाहन हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी केले आहे.
इतर बातम्या-