बीड: राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सध्या बीडच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, बीडमध्ये पावसानं थैमान घातल्याने त्यांचं संपूर्ण शेड्यूलच कोलमडलं आहे. त्यामुळे त्यांनी कामाचा झपाटा लावला आहे. दिवसभर अतिवृष्टी झालेल्या भागांची पाहणी, शेतकऱ्यांशी चर्चा, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू करत रात्री साडे दहा वाजता जलसंपदा विभागाची बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला. पाटील यांचा काल सकाळी 9 वाजता सुरू झालेला दिवस आज पहाटे पाच वाजता संपला. जयंत पाटील यांचा हा कामाचा झपाटा पाहून अधिकारी आणि कार्यकर्ते अवाक् झाले आहेत.
बीड, जालना, परभणी, औरंगाबाद आणि मराठवाड्यातील इतर भागात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक रस्ते पाण्याखाली गेले तर अनेक गावांमध्ये पाणी शिरलं. मंत्री जयंत पाटील यांनी या अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा केला व शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांना दिलासा दिला. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून पाटील राज्यभर पक्षाचा आढावा घेत आहेत. याच यात्रेच्या निमित्ताने ते काल बीड जिल्ह्यात होते. पूरपरिस्थितीची पाहणी करत असताना त्यांनी बीड जिल्ह्याच्या कार्यकारिणीचा तसेच मतदारसंघांचा आढावाही घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे गेले तीन वर्षांपासून पक्षाशी प्रत्येक माणूस जोडत आहे. त्याअनुषंगाने आज बीड व परभणी येथे असताना डॉ. मधूसूदन केंद्रे, डॉ. नरेंद्र काळे, ॲड तोतला, उषाताई दराडे आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी गाठीभेटी घेत त्यांनाही बळ दिले.
पक्षाचा कार्यक्रम संपल्यानंतर पाटील यांनी बीड जिल्ह्यातील जलसंपदा विभागाशी संबंधित प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. रात्री 10.30 वाजता त्यांनी ही बैठक घेतली.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी आपल्या शिरूर कासार येथील निवासस्थानी स्नेहभोजनाची व्यवस्था केली होती. उशीर झाला म्हणून बीडवरून शिरूर कासार येथे जाणे शक्य नव्हते. मात्र कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर पाटील शिरूरकासार येथे गेले. रात्री 12.30 वाजता ते शेख यांच्या निवासस्थानी पोहोचले. शेख यांच्या घरी भोजन घेतल्यानंतर रात्री 2 वाजता ते तिथून नगरच्या दिशेने निघाले. पहाटे 5 वाजता ते अहमदनगर जिल्ह्यात पोहोचले आणि नगरमध्ये गेल्यावर पुन्हा बैठकांना सुरुवात केली.
बीड जिल्ह्यातील विविध जल प्रकल्पांची उंची वाढविण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येतील. यामुळे जिल्ह्यातील जलसाठ्याच्या क्षमतेत मोठी वाढ होऊ शकेल, जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्रात यामुळे वाढ होईल, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यधिकारी कार्यालय येथे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल रात्री उशिरा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते
जलसिंचन प्रकल्पांमध्ये गाळ साठल्याने त्याच्या पाणी साठ्यावर परिणाम होतो आहे. पाणी साठवण क्षमता वाढ गरजेचे आहे. जिल्ह्यातील पाणीसाठा क्षमता वाढवण्यासाठी साठवण प्रकल्पांचे उंची वाढविण्यासाठी प्राप्त होणारे प्रस्ताव यांचा विचार करून निर्णय घेऊ. सिंचनाचा मुख्य उद्देश कृषी उत्पादनात भरीव वाढ होवून ग्रामीण जीवन समृध्द करणे हा आहे त्यामुळे सिंचनाचे क्षेत्र वाढविण्याच्यादृष्टीने मराठवाड्यात ज्याठिकाणी कामाची आवश्यकता असेल तेथील कामे प्राधान्याने केली जातील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यातील जलप्रकल्प, त्यांची सुरू किंवा प्रस्तावित असलेली दुरुस्ती व अन्य कामे यासह नवीन प्रस्तावित केलेली कामे तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या मागण्या आदी बाबींवर सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जयंत पाटील यांचे आभार मानले. याप्रसंगी शेतीसाठी पाण्याचे समान वाटप, सिंदफना, माजलगाव आदी प्रकल्पांसह जिल्ह्यातील पाणी प्रकल्पांचा दुरुस्ती कामांचा आढावा आणि निर्माण झालेले अडथळे दूर करून कामे तात्काळ सुरुवात करावी असे निर्देश देण्यात आले.
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 21 September 2021 https://t.co/TRbOrEU9Kh #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 29, 2021
संबंधित बातम्या:
(While on a tour of Beed, Jayant Patil inspected the flood situation)