औरंगाबाद जिल्हा परिषदेची पंचवार्षिक निवडणूक येत्या काही दिवसात होत आहे. निवडणुकीसाठीच्या हालचालीही सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी अखेरची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. मात्र यात सहा वर्षांपूर्वीच्या कार्यक्रमाच्या खर्चाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आणि महिला सदस्यांनी याला तीव्र आक्षेप घेतला. जिल्हा परिषदेत महिलांनी एकजूट दाखवत या प्रस्तावाला आक्षेपच घेतला नाही तर तो नामंजूरही केला. हा विरोध कशा प्रकारे झाला, हेही वाचणे उत्सुकतेचे आहे.
झालं असं की, शुक्रवारी जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. विद्यमान सभेचे कामकाज औपचारिक पद्धतीने व्हावे, असा प्रशासनाचा प्रयत्न होता. या सभेला उपाध्यक्ष एल जी गायकवाड, आरोग्य सभापती अविनाश गलांडे, बांधकाम सभापती किशोर बलांडे, महिला व बाल कल्याण सभापती अनुराधा चव्हाण, समाजकल्याण सभापती मोनाली राठोड, सीईओ निलेश गटणे आदी उपस्थित होते.
विषय पत्रिकेतील विषय संपल्यानंतर ऐनवेळचे विषय वाचले जाऊ लागले. सदस्य सचिव एकामागून एक विषयाचे वाचन करत होते. त्याला सदस्यांकडून मंजूर.. मंजूर असा प्रतिसाद दिला जात होता. या यादीतच अचानक विषयक्रमांक 10 – पंचायत राज समिती ऑक्टोबर 2015 करिता स्वागत समारंभासाठी झालेल्या खर्चास मान्यता मिळणेबाबत… असा होता. त्यावरही मंजूरी द्या असास आग्रह धरण्यात आला. सदस्यांचे लक्ष नाही, असा समज होता. मात्र महिलांनी यावेळी आक्रमक पवित्रा घेतला. सहा वर्षांपूर्वीचा विषय आता कसा काय आला? हा प्रश्न हिंदवी खंडागळे, पुष्पा काळे यांनी उपस्थित केला. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे हा प्रस्ताव रद्द झाला.
इतर बातम्या-