औरंगाबाद: रविवारी शहरातील आंबेडकरनगर स्मशानभूमीजवळ एका थरारक घटनेत योगेश नारायण घुगे या तरुणाला गंभीर मारहाण झाली आणि यात त्याचा मृत्यू (Murder in Aurangabad) झाला. शनिवारी संध्याकाळपासूनच योगेश आणि त्याच्या मित्रांमध्ये भांडण झाले होते. त्यानंतर रविवारीही योगेश पहाटे घराच्या गच्चीवरून बाहेर पडून भांडलेल्या मित्राकडे गेला होता. मात्र यावेळी जराही दया न दाखवता हल्लेखोरांनी पाय आणि डोक्यावर शस्त्राने वार करून त्याला रस्त्यावर फेकून दिले (Aurangabad crime). गंभीर अवस्थेत आईने पोलिसांच्या मदतीने त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र रविवारी सकाळी दहा वाजता त्याचा मृत्यू झाला.
सहा वर्षांपूर्वी राज्यभर गाजलेल्या डॉ. चित्रा डकरे खून प्रकरणातील मारेकरी अमोल घुगे याचा लहान भाऊ म्हणजे योगेश घुगे. दोन वर्षांपूीर्वी अमोलचाही खून झाला होता. आता योगेशचीही अशीच हत्या करण्यात आली. योगेश हा पत्नी, आई व वडिलांसोबत एन – 9 मधील शिवनेरी कॉलनीत राहत होता. योगेशचे वडील नारायण घुगे हे पोलीस कर्मचारी आहेत. त्याच्या दोन बहिणी विवाहित असून मोठ्या भावाचा खून व वडील अपघातात जखमी झाल्याने कुटुंबाची जबाबदारी योगेशवर होती. जून महिन्यातच त्याचे लग्न झाले होते, मात्र त्याची मित्रांची संगत चांगली नव्हती. काही दिवसांपासून त्याचे मित्रांशी वाद सुरु होते. शनिवारी त्याचे टोकाच्या भांडणात रुपांतर झाले.
योगेश व त्याच्या मित्रांमध्ये शनिवारी भांडण सुरु असताना आई आणि अन्य काही जणांनी त्यात मध्यस्थी केली होती. यात रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिनची तर योगेशच्या आईने अक्षरशः पाया पडून माफी मागितली व माझ्या मुलाला मारू नका, अशी विनवणी केली होती. परंतु योगेश मध्यरात्री बाहेर पडला अन् त्याचा घात झाला. त्याला कोणी फोन करून बोलवले का, याचा तपास पोलीस करत आहेत.
योगेशच्या खूनासाठी सचिन गायकवाड व अन्य दोन साथीदार जबाबदार असल्याची फिर्याद आईने पोलिसांत दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. आरोपी सचिन फरार असून त्याच्यावर सरकारी कामात हस्तक्षेप, बलात्कार, चोरी, लूटमारीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. योगेशला अनेक दिवसांपासून हे मित्र जीवे मारण्याची धमकी देत होते. त्याच्या भावाच्या खुनाच्या बातम्यांचे स्टेटस ठेवून त्याला अप्रत्यक्ष इशारा देत होते. मात्र हा वाद कोणत्या कारणामुळे जास्त उफाळून आला, याचे कारण पोलिसांना अद्याप समजलेले नाही.
इतर बातम्या-