औरंगाबाद: शनिवारी पहाटे आणि त्यानंतरही सुरु असलेल्या पावसाच्या तडाख्याने औरंगाबाद शहर (Aurangabad city) आणि परिसराला चांगेलच जेरीस आणले आहे. ठिकठिकाणी रस्त्यांवरून पाण्याचे लोंढे वाहत असल्यामुळे नागरिकांना प्रवास करणे कठीण होत आहे. अशातच पुराच्या पाण्यातून (Flood water) वाहन घेऊन जाण्याची किंवा पाण्यातून प्रवास करण्याची तसदी कुणीही घेऊ नये, असा इशारा जिल्हा प्रशासनाकडून (District Administration) देण्यात आला आहे. तरीही जीवावर उदार होऊन अनेकजण पाण्याने ओसंडून वाहणाऱ्या रस्त्यावर थेट वाहने नेत आहेत. अशीच एक घटना पिसादेवी परिसरात समोर आली.
शनिवारी पहाटेच झालेल्या मुसळदार पावसामुळे पिसादेवी परिसरातील पुलावरून प्रचंड वेगाने पाणी वाहत आहे. या पुराच्या पाण्यातून एका तरुणाने दुचाकी घातली. पाण्याचा प्रवाह एवढा प्रचंड होता की, तो दुचाकीवरून पडला. या तरुणाला वाचवण्यासाठी आजू-बाजूचे तरुण धावले, मात्र त्यांना केवळ दुचाकीच हाती लागली. बहुतेक हा तरुण वाहून गेला असावा, असा संशय आला.
तरुणाची बाईक हाती लागली, पण बाईकस्वार पाण्यात कुठेच दिसत नसल्यामुळे लोकांना सुरुवातीला तो वाहून गेल्याचा संशय आला. मात्र काही क्षणातच हा दुचाकीस्वार पुलाच्या पाईपच्या दुसऱ्या बाजूने प्रचंड वेगाने येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहासोबत फेकला गेला. जमलेल्या लोकांनी तत्काळ त्याला वर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
औरंगाबाद शहरातील नारेगाव आणि पिसादेवी परिसरात रात्रीच्या पावसामुळे पाणी घुसरेल आहे. अनेक दुकाने आणि घरांमध्ये रात्रीतून पावसाचे पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. तसेच दुकानातील आणि घरातील वस्तू, मालाचे मोठे नुकसान झाले आहे. पुराचे पाणी गावात आणि रस्त्यावर घुसल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
औरंगाबादमध्ये शनिवारी पहाटेपासून सुरू असलेल्या पावसाने सोयगावात पूर आला आहे. या पुरामुळे सोयगाव मार्गे पाचोरा जोडणारा राज्यमार्ग बंद पडला आहे. सोयगाव तालुक्यातील तिडका नदीला तुफान पूर आला आहे. या पुरामुळे सोयगाव मार्गे पाचोरा जोडणारा राज्यामर्ग बंद पडला आहे. त्यामुळे औरंगाबाद जळगाव या दोन जिल्ह्यांचा संपर्क तुटला आहे. सध्या नदीच्या काठावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या.
02 ऑक्टोबर रोजी पहाटे 03.25 वाजता औरंगाबाद शहरात हलक्या पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर 03.38 दरम्यान मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर आभाळात एका-मागून एक वीजा कडाडल्याचा आवाज येऊ लागला. त्यामुळे निसर्गाचं आणखी किती भयाण रौद्ररुप पहायला मिळणार, या धास्तीने औरंगाबादकरांची झोप उडाली. पहाटे 03.38 ला सुरु झालेला पाऊस 04.03 वाजेपर्यंत अखंड बरसत होता. या पंचवीस मिनिटात सरासरी 118 मिली प्रति तास या वेगाने पावसाच्या सरी कोसळत होत्या.
इतर बातम्या
औरंगाबादेत तिसऱ्यांदा आभाळ फाटलं, पहाटेतूनच कडाडणाऱ्या विजांचा वर्षाव, नागरिकांची झोप उडाली