औरंगाबाद: शहरातील सातारा परिसरातील एका भाडेकरूने तुम्हाला शेअर मार्केटमध्ये चांगलाच फायदा करून देतो, असा भूलथापा मारत घरमालकाला तब्बल 4 लाख रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले (Tenant cheated the landlord) आहे. आधी ऑनलाइन शॉपिंगचे व्यवहार (Online shopping) करून देण्यासाठी घरमालकांचा मोबाइल वारंवार वापरल्यानंतर काही दिवसातच भाडेकरून घरमालकांची बँकेची माहिती मिळवून परस्पर त्यांच्या नावे कर्जही घेऊन टाकले. कर्जाची रक्कम नंतर स्वतःच्या खात्यात जमा केली. फसवणूक झाल्याचे कळताच घरमालकांनी पोलिसात धाव घेतली. मात्र तोपर्यंत भाडेकरू फरार झाला. त्यामुळे आपला मोबाइल कोणत्याही पैशांच्या व्यवहारासाठी इतरांच्या हाती देताना सावधगिरी बाळगणे किती आवश्यक आहे, हेच यावरून लक्षात येते.
सातारा परिसरातील लक्ष्मी रेसिडेन्सीमध्ये राहणारे 60 वर्षीय रमेश नानुलाल मिश्रा यांच्याकडे मनोज घोडके हा तरुण भाडेतत्त्वावर राहत होता. नोकरीनिमित्त शहरात आलेल्या मनोजने सुरुवातीला मिश्रा यांना शेअर मार्केटविषयी माहिती देण्यास सुरुवात केली. त्यांना ऑनलाइन संकेतस्थळावरून वस्तू मागवून देऊ लागला. तसेच बँकेची इतरही ऑनलाइन कामे तो करून देऊ लागला. हे करताना मिश्रा यांचा मोबाइल तो सराइतपणे हाताळू लागला. काही दिवसांनी तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होईल, असा सल्ला देत मनोजने मिश्रा यांना डीमॅट खाते उघडायला सांगितले. त्याचे ओटीपी, पासवर्ड ही सगळी माहिती मनोजकडेच होती.
2019 या वर्षातील जून, जुलै आणि ऑगस्ट या काळात मनोजने मिश्रा यांच्या डीमॅट खात्यात व्यवहार केला. मात्र शेअर मार्केटमधून चांगला परतावा येत नसल्यामुळे त्यांनी गुंतवणूक थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही मनोजने मिश्रा यांचा मोबाइल व इतर माहितीचा गैरवापर करून विविध बँकांतून ऑनलाइन 4 लाख 25 हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्यापैकी तीन लाख 85 हजार रुपये स्वतःच्या कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यात वळते केले. हा प्रकाकर मिश्रा यांना कळाल्यावर त्यांनी थेट कोर्टात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर गुरुवारी या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक सर्जेराव सानप हे या प्रकरणी अधिक तपास करत आहे.
ज्येष्ठ नागरिकांना मोबाइल शिकवण्याच्या बहाण्याने त्यांचा मोबाइल आणि गोपनीय माहिती हस्तगत करून गैरप्रकार झाल्याची अनेक प्रकरणे याआधीही उघडकीस आली आहेत. तरीही नागरिकांनी अशा व्यवहारांबाबत अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे, असे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आले आहे. विशेषतः जे ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात, त्यांच्यासोबत मुलगा किंवा इतर कुणी तरुण मुले राहत नाहीत त्यांनी अशा गोष्टींमध्ये विशेष काळजी घेतली पाहिजे. (Young tenant cheated the landlord by pretending to make a profit in the stock market, Aurangabad, Maharashtra)
इतर बातम्या-