‘पूजा खेडकर यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी’, बच्चू कडू यांची मोठी मागणी

| Updated on: Jul 16, 2024 | 6:07 PM

आमदार बच्चू कडू यांनी पूजा खेडकर यांच्याबद्दल मोठी मागणी केली आहे. पूजा खेडकर यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, पूजा खेडकर यांचं महाराष्ट्रातलं प्रशिक्षण आता थांबवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

पूजा खेडकर यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी, बच्चू कडू यांची मोठी मागणी
पूजा खेडकर आणि बच्चू कडू
Follow us on

वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना मोठा धक्का बसला आहे. राज्य सरकारने पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण थांबवलं आहे. दुसरीकडे प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी पूजा खेडकर प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मोठी मागणी केली आहे. पूजा खेडकर यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. “पूजा खेडकर यांना जन्मठेपेची शिक्षा व्हायला पाहिजे. यामध्ये जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई झाली पाहिजे”, अशी भूमिका बच्चू कडू यांनी मांडली आहे. बच्चू कडू यांच्या या मागणीनंतर आता सरकार काय भूमिका घेतं? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पूजा खेडकर यांनी दिव्यांग असल्याचा दावा करत त्या यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. तर बच्चू कडू हे राज्यातील दिव्यांग मंत्रालयाचे प्रमुख आहेत. बच्चू कडू यांच्याकडून दिव्यांगांसाठी काम केलं जातं. त्यामुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. पूजा खेडकर यांनी यूपीएससीकडे दिव्यांग असल्याची खोटी बतावणी केल्याची चर्चा आहे. यावरुनच बच्चू कडू यांनी पूजा खेडकर यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?

“पूजा खेडकरला जन्मठेप व्हायला पाहिजे. हायकोर्टाचे निकाल बदलायला लागले आहेत. आता काय राहिले? UPSC सारखी संस्था जर अशी वागत असेल तर त्या संस्थेवर सुद्धा दंडात्मक कारवाई झाली पाहिजे. पूजा खेडकरला पदावरुन बाहेर काढून तिला जन्मठेपेपर्यंत पोहोचवले पाहिजे. पुन्हा असा कोणी गुन्हा करणार नाही, अशाप्रकारची व्यवस्था केली पाहिजे”, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.

‘अशा झारीतल्या शुक्राचार्यांना आपण शोधून काढू’

“दिव्यांगांचा फायदा सामान्य नोकरीत असणारे कर्मचारीने घेतला असल्याची माहिती मला पण समजली आहे. यावर मी आधी पण बोललो आहे. यामध्ये एक समिती गठीत करत आहे. ज्यांनी फसवणूक करून दाखले घेतले आहेत, अशा लोकांवर सुधारित नवीन कलमानुसार फसवणुकीचे गुन्हे दाखल होतील. पूजा खेडकर दिव्यांग नसताना तिने याचा लाभ घेतला. अशा झारीतल्या शुक्राचार्यांना शोधून काढू”, असं बच्चू कडू म्हणाले.

‘आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर..’

“शेतकरी, मजूर, दिव्यांग बांधव यांच्याबाबत जे विषमतेचे रोपटे या 75 व्या वर्षात सरकारने लावले आहे. या देशामध्ये जातीभेदापेक्षा विषमता वाद मोठा जाणवतोय. हा वाद भविष्यात मोठा होण्याची शक्यता आहे. सगळ्याच क्षेत्रात विषमतेचे बीजं रोवली गेली आहेत. जातीवाद आणि धर्मवादापेक्षा हा प्रकार वेगळा आहे. कलेक्टरला अडीच लाख पगार देत असताना चपराशाला चाळीस हजारात समाधान मानावे लागते. पाच एकर शेती असणाऱ्या शेतकऱ्याला 15 हजार ही मिळू नयेत?”, असा सवाल बच्चू कडू यांनी केला.

“हे विषमतेचे रोपटे सर्व पक्षांनी लावले. ते आम्हाला उखाडून काढायचे आहे. जातीयवाद आणि धर्मवाद समोर ठेवला जातो हे राजकीय पक्षाचे व्यवस्थित प्लॅनिंग आहे. हे प्लॅनिंग आम्ही तोडणार आहोत. आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर या पुढील काळात आम्ही स्वतंत्र लढाई लढणार आहोत. ही आमची तिसरी आघाडी नसून शेतकरी, कष्टकरी आणि शेतमजुरांची आघाडी आहे. शेतकरी, मजूर, कष्टकऱ्यांची आघाडी तयार करू आणि दुधारी तलवारीने सर्व पक्षाच्या पार्टीच्या सोबत मुकाबला करू”, असं बच्चू कडू म्हाले.

‘याला कोणी बळी पडू नये’

“आरक्षणाबाबत सर्व पक्षांनी स्पष्ट भूमिका घेण्याची गरज आहे. भूमिका स्पष्ट झाली तर यामधील वाद निघू शकतो. धर्माच्या नावावरचा वाद संपल्यानंतर जातीचा वाद निर्माण केला जातोय. हे व्यवस्थित प्लॅनिंग आहे याला कोणीही बळी पडू नये. मराठा, ओबीसी आरक्षण पाहिले तर ओबीसीमधील दहा टक्के केंद्रातून घ्यायला हवे. ज्या ओबीसीमध्ये 27% कोटा आहे. त्या ठिकाणी 37% होण्याची गरज आहे”, अशी भूमिका बच्चू कडू यांनी मांडली.