‘महाराष्ट्रात परिस्थिती पाहता प्रहारचा मुख्यमंत्री होऊ शकतो’, बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य

| Updated on: Nov 21, 2024 | 9:42 PM

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतरच्या एक्झिट पोलनुसार, लहान पक्ष आणि अपक्षांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात काँटे की टक्कर आहे. दुसरीकडे प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू यांनी सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावण्याचा आणि मुख्यमंत्रीपद मिळण्याचा दावा केला आहे. दुसरीकडे निकालानंतर 48 तासांच्या आत सरकार स्थापना न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात परिस्थिती पाहता प्रहारचा मुख्यमंत्री होऊ शकतो, बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
बच्चू कडू
Follow us on

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर समोर झालेल्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात सत्ता स्थापनेसाठी काँटे की टक्कर बघायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत छोटे पक्ष आणि अपक्ष हे या निवडणुकीत किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांसोबत बोलणी सुरु झाल्याची चर्चा सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे या वेळची निवडणूक फार वेगळी आहे. कारण निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षांना केवळ 48 तासांची मुदत असणार आहे. या 48 तासांत सरकार स्थापन नाही झालं तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. या घडामोडी पाहता राज्यात पुन्हा ऑफिस पॉलिटिक्स घडू शकतं. या सर्व धामधुमीत प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी सत्ता स्थापनेबाबत मोठा दावा केला आहे. राज्यात परिस्थितीनुसार प्रहारचा मुख्यमंत्रीदेखील बनू शकतो, असं मोठं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे.

बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?

“राज्यात लहान पक्ष आणि अपक्ष सरकार बनविणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी किंवा महायुतीला पाठिंबा द्यावा लागेल”, असा दावा बच्चू कडू यांनी केला. “मतदानाचा टक्का वाढला आहे. त्याला विविध कारणं आहेत”, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. “आमचे 17 मुद्दे आहेत. हे मुद्दे घेऊन आम्ही समोर जात आहोत. महाविकास आघाडीतील कुठले पक्ष एकत्र राहणार नाही त्यांना आमच्यासोबत यावं लागेल”, असं बच्चू कडू म्हणाले.

हे सुद्धा वाचा

यावेळी बच्चू कडू यांना मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलं. राजकारणात काहीही होऊ शकतं. झारखंडमध्ये एक आमदार मुख्यमंत्री होऊ शकतो. परिस्थिती बघता प्रहारचा मुख्यमंत्री होऊ शकतो, असं मोठं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं. “निवडणुकीत लाडक्या बहीण योजनाचा परिणाम दिसेल. त्याच हिशोबाने सरकारने योजना आणली होती”, असं स्पष्ट मत बच्चू कडू यांनी मांडलं.