स्वप्निल उमप, टीव्ही 9 मराठी, अमरावती : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत खूप मोठी बातमी समोर आलीय. मंत्रिमंडळ विस्तारावरुन आमदार बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केलीय. मंत्रिमंडळ विस्तार होणार नसेल तर स्पष्ट सांगा, असं आवाहन बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलंय. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन सहा महिने उलटले तरी राज्य मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार अद्याप झालेला नाही. मंत्रिंडळ विस्तारावरुन सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांकडून आता वेगवेगळे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. असं असताना सत्ताधारी पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेले प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आपली नाराजी उघडपणे जाहीर केलीय. बच्चू कडू यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया देत आपली नाराजी व्यक्त केली.
“आम्हालाही असं वाटतंय की, एकतर विस्तार करु नका. डायरेक्ट सांगून द्या की, विस्तार होत नाही. सगळे शांततेने सरकारसोबत राहतील”, असं बच्चू कडू म्हणाले.
“ते काय म्हणतात? फुल काढायचं, पुन्हा खिशात ठेवायचं, काय टेक्निकल बाबी असतील ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगाव्यात. या अडचणी आहेत, यामुळे विस्तार होऊ शकत नाही”, असं बच्चू कडू म्हणाले.
“सगळे 60 आमदार कुणीही काय बोलणार नाही. एकतर करा, नाही होत असेल तर स्पष्ट सांगा. कारण बऱ्याच आमदारांमध्ये कुजबूज चालू आहे”, असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं.
“जे 50-60 आमदार आहेत, याशिवाय मीडियावाले विचारता कधी होणार विस्तार, ते काही माझ्या हाती आहे का? हा प्रश्न तुम्ही शिंदे आणि फडणवीस यांना विचारायला पाहिजे”, असं बच्चू कडू म्हणाले.
“माझे दोन आमदार आहेत. दोन आमदाराच्या माणसाला मंत्रिमंडळ ठरवण्याचा अधिकार नाहीय. पण येस किंवा नो ते सांगून टाकलं पाहिजे”, असं आवाहन त्यांनी केलं.
“देवेंद्र फडणवीस सांगत होते की अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार करु. नंतर अधिवेशन झालं. काही टेक्निकल प्रोब्लेम असेल. आमची त्यावर काही नाराजी नाहीय. पण माझं म्हणणं आहे की, स्पष्टपणे सांगून दिलं पाहिजे”, असं ते म्हणाले.
“हे काम प्रमुख लोकांचं आहे. त्यांनी स्पष्ट करुन सांगायला पाहिजे. त्यातून जनतेमधील संभ्रम दूर केला पाहिजे”, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.