राज्यात मंगळवारी दहीहंडी उत्सव सर्वत्र जल्लोषात साजरा होत आहे. परंतु या उत्सवावर बदलापूर येथे मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे पडसाद दिसले. गोविंदा पथकाने यासंदर्भात बॅनर झळकवून लक्ष वेधले. तसेच सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचे पडसाद दिसून आले. या दोन घटनांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी केली.
भाजपचे वडाळा मतदार संघाचे आमदार कालीदास कोळंबकर यांच्याकडून आयोजित दहीहंडीमध्ये महिला गोविंदांनी पोस्टरबाजी केली. ‘अजून किती विरोध, मेणबत्ती जाळून कारायचा, पण नराधमाला कधी जाळायचा’ असे बॅनर या गोविंदानी झळकवले. त्याची चांगली चर्चा झाली. दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी केली होती.
वरळी कोळीवाडयात ठाकरे गटाकडून दहिहंडीचे आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणी गोविंदा पथकाकडून थर रचायला सुरूवात करणार एवढयात अँब्युलस आली. त्यावेळी गोविंदानी सामाजिक भान दाखवत अँब्युलसला जाण्यासाठी जागा करून दिली.
जळगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने महायुतीच्या काळ्या कारनाम्यांची आशयाची दहीहंडी फोडण्यात आली. महायुतीच्या सरकारचा अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्यावरूनही महायुती सरकारवर टीका करण्यात येऊन निषेध व्यक्त करण्यात आला. वेगवेगळ्या घटनांची बॅनर आणि हातात काळे फुगे घेऊन निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी दहीहंडी फोडण्यात येवून निषेध व्यक्त करण्यात आला.
दहीहंडीचा मुहूर्त साधत कोल्हापुरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झाला. कोल्हापुरात महायुतीच्या सरकार विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अनोखं आंदोलन करत सर्वांचं लक्ष वेधले. महायुतीचे काळे कारनामे या आशयाचा पेपर प्रसिद्ध करून त्याचे वाटप कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये करण्यात आले. त्यामध्ये महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये केलेल्या कामाचा काळ्या कामांचा पंचनामा करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील आणि शहराध्यक्ष आर.के. पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारचा पंचनामा करत हे अनोख आंदोलन केला आहे.