रमेश शर्मा, मुंबई, दि.19 डिसेंबर | महाराष्ट्रात मराठा आरक्षणचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण केले आहे. त्यानंतर मराठा आरक्षणचा विषयावरुन राज्यातील वातावरण हिवाळ्यात गरम झाले आहे. ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद सुरु झाला आहे. मनोज जरांगे पाटील राज्यभरात सभा घेत असताना त्यांना उत्तर देण्यासाठी ओबीसी नेते छगन भुजबळ आणि इतर जण सभा घेत आहेत. राज्य सरकार या विषयावर अडचणीत आले आहे. राज्य सरकारने या प्रकरणी न्या. शिंदे समिती नेमली होती. त्या समितीचे दोन अहवाल आले आहेत. त्याचवेळी मनोज जरांगे पाटील यांनी २४ डिसेंबरनंतर सरकारला मुदत देण्यात येणार नसल्याचे सांगितले आहे. राज्यातील या वातावरणात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठा दावा केला आहे. त्यांनी आपल्याकडे मराठा आरक्षणावर उपाय असल्याचे सांगितले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे यांच्या मागणीवर माझ्याकडे उपाय आहे. परंतु आता मी उपाय सांगितला तर हे सत्ताधारी त्या तोडग्याचे खोबरे करतील. त्यामुळे आरक्षण प्रश्नाचा सर्वमान्य तोडगा मी आता सांगणार नाही. हा तोडगा नवीन सरकार आल्यानंतर मी सांगणार आहे. माझ्या तोडग्यामुळे आरक्षणाचा मुद्दा ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हाताळता येणार आहे. नव्या सरकारला मराठा आरक्षणाचा विषयावर मी राज्यकर्त्यांना सांगणार नाही.
मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी दिलेली तारीख काही दिवसांवर आली आहे. आता पुन्हा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा संवाद दौरा सुरु करत आहे. येत्या 20 तारखेपासून त्यांचा हा दौरा सुरु होत आहे. मनोज जरांगे पाटील यांचा मराठा संवाद दौऱ्याच्या हा पाचव्या टप्पा आहे. 20 डिसेंबर ते 23 डिसेंबर असा जरांगे पाटील यांचा चार दिवस दौरा आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई, जालना जिल्ह्यातील बदनापूर, परभणी जिल्ह्यातील सेलू, सोनपेठ, गंगाखेड आणि लातूर जिल्ह्यातील रेणापूर आणि बीड येथे 23 तारखेला जरांगे पाटील यांची इशारा सभा होणार आहे.