राडा नालासोऱ्यात, भूकंप डहाणूत, महाराष्ट्राच्या इतिहासात अभूतपूर्व हालचाली

| Updated on: Nov 19, 2024 | 4:09 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा अभूतपूर्व घडामोडी घडायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान आहे. पण त्याआधल्या दिवशीच नालासोपाऱ्यात मोठा राडा झाला. त्यानंतर डहाणूत मोठा राजकीय भूकंप बघायला मिळाला.

राडा नालासोऱ्यात, भूकंप डहाणूत, महाराष्ट्राच्या इतिहासात अभूतपूर्व हालचाली
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
Follow us on

नालासोपाऱ्यात आज मोठा राजकीय राडा बघायला मिळाला. त्यानंतर डहाणूत मोठा राजकीय भूकंप घडला. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा अभूतपूर्व घडामोडी घडायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान आहे. पण त्याआधल्या दिवशीच नालासोपाऱ्यात विवांत हॉटेलमध्ये बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे पुत्र क्षितीज ठाकूर यांनी भाजप नेते विनोद तावडे यांना स्थापनबद्ध केलं. विनोद तावडे नालासोपाऱ्यात विवांत हॉटेलमध्ये त्यांचे उमेदवार राजन नाईक यांच्या भेटीसाठी आले होते. दोन्ही नेते हॉटेलमध्ये बसलेले असतानाच अचानक ठाकूर पिता-पुत्र कार्यकर्त्यांसह विवांत हॉटेलमध्ये आले. त्यांनी विनोद तावडे यांच्यावर गंभीर आरोप केला.

विनोद तावडे पैसे वाटपासाठी बॅगेत 5 कोटी रुपये घेऊन आले, असा आरोप ठाकूर पिता-पुत्रांनी केला. यावेळी क्षितीज ठाकूर यांनी पैशांचं बंडल देखील माध्यमांना दाखवले. ठाकूर पिता-पुत्रांनी आणि विनोद तावडेंनी एकत्र पत्रकार परिषद सुरु केली. पण निवडणूक आयोगाने ती पत्रकार परिषद तिथेच थांबवली. ठाकूर पिता-पुत्र दोन्ही नेते हे उमेदवार असल्याने त्यांना पत्रकार परिषद घेता येणार नाही, असं निवडणूक आयोगाचं म्हणणं होतं. त्यामुळे ती पत्रकार परिषद तिथेच थांबवण्यात आली.

डहाणूत मोठा राजकीय भूकंप

यानंतर सर्व नेते विवांत हॉटेलबाहेर पडले. विशेष म्हणजे सलग 4 तास या नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर विनोद तावडे आणि ठाकूर पिता-पुत्र हे एकाच गाडीने जेवणासाठी गेल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं. नालासोऱ्यात चार तास हा राडा झाल्यानंतर आता डहाणूत मोठा राजकीय भूकंप घडून आल्याची माहिती समोर येत आहे. डहाणूच्या बविआच्या उमेदवाराने मतदानाला एक दिवस बाकी असतानाच भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे डहाणूत महाराष्ट्राच्या इतिहासात अभूतपूर्व घडामोडी घडत असल्याचं बघायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

डहाणूत मतदानाआधी बविआ उमेदवाराचा भाजपात प्रवेश

डहाणू विधानसभेचे बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराने भाजप उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. डहाणू विधानसभेचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार सुरेश पाडवी यांनी डहाणू विधानसभेचे भाजप उमेदवार विनोद मेढा यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यांनी मतदानाच्या एक दिवस आधीच माघार घेतली आणि भाजपला पाठिंबा दिला आहे. सुरेश पाडवी यांनी भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पुन्हा घरवापसी केली. त्यामुळे डहाणू विधानसभेत बहुजन विकास आघाडीला खिंडार पडले आहे.