पणजी – जेव्हा राज्यातील सत्तानाट्य क्लायमेक्सवर होते, सगळ्यांच्या नजरा जेव्हा एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde)असलेल्या बंडखोर आमदारांच्या मूव्हमेंटवर होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची एक महिला नेता 2019 प्रमाणेच आमदारांना हॉटेलातून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात होती. मूळ हरियाणातील असलेल्या 30 वर्षांच्या या महिलेचे नाव आहे सोनिया दहून. सोनिया दहून (Sonia Dahoon)या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा (NCP student wing)आहेत. सोनिया दहून यांच्यामुळेच 2019 साली भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे काही तासांचे सरकार पडले होते. 2019 साली विधासभा निवडणुकीच्या निकालानंतर पेच निर्माण झाला होता. त्यावेळी फडणवीस आणि अजित पवार यांनी एके दिवशी सकाळीच त्यांचा शपथविधी उरकला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे चार आमदार हे गुरुग्रामच्या एका हॉटेलमध्ये थांबले होते, त्या चारही आमदारांची सुटका सोनिया यांनी केली होती.
2019प्रमाणेच गोव्यात पोहचलेल्या शिवसेनेच्या आंमदारांचे मन परिवर्तनाचा प्रयत्न सोनिया दहून यांनी केला, मात्र हे प्रकरण त्यांच्या अंगाशी आले. सोनिया दहून या कामगिरीसाठी गोव्यातील डोना पाऊला या परिसरात असलेल्या ताज रिझॉर्ट आणि कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पोहचल्या होत्या. त्यांनी चेक इनही केले होते. मात्र ऐन वेळी त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यासोबत एक साथीदारही होता. त्या दोघांना रविवारी जामीन मंजूर करण्यात आला आहे.
शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांशी संपर्क करण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना पकडले. खोटी कागदपत्रे सादर करुन सोनिया आणि त्यांचा सहकारी श्रेय कोठियाल यांनी हॉटेलात घुसण्याचा आरोप पोलिसांनी केला होता. मात्र सोनिया यांनी हे आरोप नाकारले आहेत. पोलिसांनी दहशतवाद्यांच्या पद्धतीची वागणूक आपल्याला दिल्याचा त्यांचा आरोप आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना त्रास दिल्याचेही सोनिया यांचे म्हणणे आहे.
सोनिया दहून यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे- पोलीस, कमांडो आणि एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी साडे पाचच्या सुमारास त्यांना हॉटेलमधून उचलले. पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी दहशतवादी असल्याप्रमाणे वागणूक दिली. त्यांची अनेक तास चौकशी करण्यात आली.
जामीन मिळाल्यानंतर सोनिया दहून यांनी ट्विट केले आहे, यात तुम्ही मला धोकेबाज ठरवलेत, तुरुंगात टाकलेस सरकारी यंत्रणांच्या चौकशीच्या नावाखाली मला त्रास दिलात, मात्र मी हिंदुस्तानची बेटी आहे. शरद पवार आणि कोट्य़वधी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची ताकद माझ्या मागे आहे. तुमच्या चार दिवसांच्या सत्तेला मी घाबरत नाही. संघर्ष सुरु राहील, सत्य मेव जयते. असे लिहिले आहे. सोनिया आणि श्रेय हे पर्यटनासाठी गोव्यात आले होते, मात्र त्यांना नाहक त्रास देण्यात आला, असा आरोप राष्ट्रवादी युवा खाशेचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी केला आहे. या सहकाऱ्यांना अडकवण्यात आले, असेही त्यांचे म्हणणे आहे. गोवा सरकारने महाराष्ट्रातील आमदारांना सुरक्षा पुरवली, मात्र तरुणांना नाहक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.