डोंबिवली: अल्टिमेटम फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेच (balasaheb thackeray) देऊ शकतात. तेच अल्टिमेटम देत होते. इतर कुणी राज्य सरकारला अल्टिमेटम देऊ शकत नाही या शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांच्या विधानावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) हे बाळासाहेबांच्यात तालमीत वाढले आहेत. त्यामुळे अल्टिमेटम देण्याचा गुण त्यांच्याकडे आला आहे, असा टोला बाळा नांदगावकर यांनी लगावला आहे. बाळा नांदगावकर आज डोंबिवलीत आले होते. यावेळी नांदगावकर यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला आहे. तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं मनसेकडे लक्ष आहे, याचा आनंद वाटतोय, असा चिमटाही त्यांनी पवारांना काढला. येत्या 3 मे पर्यंत भोंगे हटवण्याची डेडलाईन मनसेने राज्य सरकारला दिली आहे. भोंगे हटवले नाही तर 3 मे नंतर मशिदीसमोरच हनुमान चालिसा सुरू करणार असल्याचा इशारा राज यांनी दिला आहे.
राज ठाकरे यांनी ठाणे येथील सभेमध्ये मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी 3 मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. या अल्टिमेटम नंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी अल्टिमेटम फक्त बाळासाहेब ठाकरे देऊ शकतात अशी टीका केली होती. त्यावर बाळा नांदगावकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बाळासाहेबांच्या तालमीत राज ठाकरे तयार झालेले आहेत. त्यामुळे बाळासाहेबांचे बरेच गुण राज ठाकरेंमध्ये आले आहेत. अल्टिमेटम हा उपजत गुण आहे तो राज यांच्यात आला आहे, असंही त्यांनी सांगितलं. आज डोंबिवलीत मनसे आमदार राजू पाटील यांची पुतणी सायली हिच्या लग्नासाठी शर्मिला ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे, मनसे नेते बाळा नांदगावकर आले होते. तसेच यावेळी अनेक दिग्गजांनीही हजेरी लावली होती.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या टीकेवरही प्रत्युत्तर दिलं. शरद पवार लवकर प्रतिक्रिया देत नाहीत. राज साहेबांच्या दोन्ही सभांनंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. म्हणजे शरद पवार यांचे राज ठाकरे आणि मनसेवर लक्ष आहे याचा आम्हाला आनंद आहे, असा चिमटाही नांदगावकर यांनी काढला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी अल्टिमेटम दिला होता. आज 12 एप्रिल आहे. आजपासून ते 3 मेपर्यंतची डेडलाईन देतो. जर 3 मे पर्यंत भोंगे हटवले नाही तर मशिदीसमोर आम्ही भोंगे लावू, असा इशारा देतानाच माझ्या भात्यात अजूनही काही हत्यारे आहेत. ही हत्यारे मी अजून काढली नाहीत. ती काढण्यास मला प्रवृत्त करू नका, असा इशाराही त्यांनी दिला होता.
संबंधित बातम्या:
राज ठाकरेंच्या ‘त्या’ भुमिकेनंतर मुस्लीम कार्यकर्ते नाराज, 35 जणांनी दिला मनसेचा राजीनामा