मुंबई : आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं आज निधन झालं. ते 81 वर्षांचे होते. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. बालाजी तांबे यांच्या पश्चात पत्नी वीणा तांबे, मुलगा सुनील, संजय, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तांबे यांना ट्विटरवरुन श्रद्धांजली अर्पण केली. बालाजी तांबे यांच्या निधनानं विशाल वैश्विक कुटुंब पोरके झाले, असं शरद पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय. (Tribute to Balaji Tambe from NCP President Sharad Pawar)
‘ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य आणि योगतज्ज्ञ डॉ. बालाजी तांबे यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. चिंतनशील मार्गाने अथक केलेली योगसाधना आणि आत्मसंतुलनाचा त्यांनी दाखवलेला मार्ग त्यांच्या असंख्य भारतीय आणि पाश्चात्त्य अनुयायांना सकारात्मक जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी पथदर्शी ठरला आहे. वैयक्तिक पातळीवर मी त्यांचे आयुर्वेदिक उपचार घेऊन त्यांचा स्नेह अनुभवला. जिज्ञासू भाव आणि सातत्याने संशोधन यातून त्यांनी आयुर्वेदाला शास्त्रोक्त पद्धतीने जगासमोर मांडले. त्यांचे तत्त्वज्ञान रोजच्या मानवी जगण्याशी एकरूप झाले आहे. त्यांच्या जाण्याने त्यांचे विशाल वैश्विक कुटुंब आज पोरके झाले आहे. डॉ. बालाजी तांबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!’, अशा शब्दात शरद पवार यांनी बालाजी तांबे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
वैयक्तिक पातळीवर मी त्यांचे आयुर्वेदिक उपचार घेऊन त्यांचा स्नेह अनुभवला. जिज्ञासू भाव आणि सातत्याने संशोधन यातून त्यांनी आयुर्वेदाला शास्त्रोक्त पद्धतीने जगासमोर मांडले. त्यांचे तत्त्वज्ञान रोजच्या मानवी जगण्याशी एकरूप झाले आहे.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 10, 2021
आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. डॉ. तांबे यांच्या निधनामुळे आयुर्वेद आणि रोजच्या जगण्यात आहार-विहार आणि विचारांच्या संतुलनाबाबत मार्गदर्शन करणारे आरोग्यपूजक व्यक्तिमत्व काळाने हिरावून नेले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, आयुर्वेद आणि योगाच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनात आरोग्यदायी बदल घडवण्याचा डॉ. बालाजी तांबे यांनी ध्यास घेतला होता. त्यांची दर्जेदार औषध निर्मितीतून त्यांनी आयुर्वेदाचा देश, विदेशातही प्रसार केला. आहार, विहार आणि विचार यांच्या संतुलनातच आरोग्याची गुरुकिल्ली आहे, हा संदेश त्यांनी सहज, सोप्या आणि ओघवत्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहचवला. अध्यात्माची आणि आरोग्याची सांगड घालण्यामुळे अनेकांनी त्यांना आपल्या जीवनात गुरूचे स्थान दिले. आयुर्वेदाबाबतचा डोळस दृष्टीकोन निर्माण करण्यात आणि नव्या पिढीत त्याबाबतची गोडी निर्माण करण्यात डॉ. तांबे यांचे मोलाचे योगदान राहीले आहे. त्यांचे हे योगदान सदैव स्मरणात राहील. आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय वाईट वाटले. त्यांच्या निधनाने एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशा शोकसंवेदना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. बालाजी तांबे यांच्याशी माझा वैयक्तिक स्नेह होता. आयुर्वेद आणि प्राचीन भारतीय चिकित्सा पद्धती यावरील अभ्यास आणि संशोधनात त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय असेच आहे, असं फडणवीस म्हणाले.
संबंधित बातम्या :
बालाजी तांबे यांच्या निधनाने ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपले : देवेंद्र फडणवीस
Tribute to Balaji Tambe from NCP President Sharad Pawar