काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याविरोधात भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी आक्षेपार्ह विधान केलं त्यानंतर आता राजकारण चांगलंच तापलं असून, विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. या प्रकरणावर आता बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. राजकारणात आपण भाषण करतो, लोकशाहीमध्ये मत मतांतर असतात. मत मांडण्याचा अधिकार लोकशाहीनं दिला आहे. परंतु पूर्वीच्या वेळी एक दर्जा राखला जायचा, आता मात्र पातळी अत्यंत खालावली आहे, असं थोरात यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले थोरात?
राजकारणात आपण भाषण करतो, लोकशाहीमध्ये मत मतांतर असतात. मत मांडण्याचा अधिकार लोकशाहीनं दिला आहे. परंतु पूर्वीच्या वेळी एक दर्जा राखला जायचा, आता मात्र पातळी अत्यंत खालावली आहे. सुजय विखे हे संगमनेर तालुक्यातील आहेत, बोलण्याचा त्यांचा अधिकार आहे. मात्र भाषण कोण करतंय आणि काय करतंय हे पण पाहिलं पाहिजे. तिथे खालच्या पातळीवर भाषण सुरू होते, त्यांचा एक कार्यकर्ता उठला आणि अत्यंत वाईट, हिन, गलिच्छ शब्दात ज्याचं वर्णन सुद्ध करून शकत नाही अशा शब्दात त्यांनी जयश्री यांच्या संदर्भात वक्तव्य केलं. त्याचा मी निषेध करतो असं थोरात यांनी म्हटलं आहे.
माझ्यावर महाराष्ट्राची जबाबदारी आहे, माझ्या मतदारसंघाने सांगितलं आहे की तुम्ही महाराष्ट्राची जबाबदारी घ्या आम्ही संगमनेर सांभाळतो. या प्रकरणात कारवाई संदर्भात ते पाहात आहेत. जयश्रीचा यांचा दौरा सुरू आहे, कार्यकर्ते आणि नागरिक हे सर्व सांभाळायला समर्थ आहेत. अजूनही गुन्हेगार पकडला गेला नाही, इतकं वाईट वक्तव्य केल्यानंतर अजूनही जर तो कुठे लपून बसत असेल तर त्याचा शोध घेण्याची जबाबदारी आता पोलिसांची आहे, असंही यावेळी थोरात यांनी म्हटलं.
उद्धव ठाकरेंच्या भेटीवर प्रतिक्रिया
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत काही बाबींवर मी चर्चा केली. खर्गे यांनी माझ्यावर जबाबदारी दिली होती की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत जागा वाटपासंदर्भात चर्चा करावी, काही जागा अदलाबदल करण्यात येते का यावर चर्चा करण्यात यावी त्यावर चर्चा झाल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे.