मुंबई : बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांना महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणं चांगलंच भोवलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. विशेष म्हणजे त्यांनी जाहीरपणे दिलगीरी व्यक्त केलेली असली तरी या प्रकरणावर पडदा पडताना दिसत नाहीये. महिला आयोगाने (Women’s Commission) त्यांच्याकडे खुलासा मागवला आहे. तसेच बंडातात्या कराडकर यांच्यासह 125 वारकऱ्यांवर सातारा (Satara Police) शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. विनापरवाना जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणी कलम 269, 270, 188, 37(1)(3) 135 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंडातात्या कराडकर यांनी राज्य शासनाच्या वाईन विक्री निर्णयाच्या विरोधात दंडुका-दंडवत मोर्चा काढला होता.
बंडातात्या कराडकर यांनी राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयाला विरोध केला. तसेच त्यांनी वाईन आणि दारुविषयी बोलताना राज्यातील महिला नेत्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये केली. सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारु पितात, असं वक्तव्य बंडातात्या यांनी केलं होतं. त्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता हे आपण पुराव्यानिशी सिद्ध करु शकतो, असंही बंडातात्या पुढे जाऊन म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यामुळे राज्यात वादंग माजले आहे.
बंडातात्या करडाकर यांचे महिलांविषयीचे असे बोलणे कदापि खपवून घेतले जाणार नाही, अशी भूमिका राज्यातील महिला नेत्यांनी घेतली आहे. कराडकर स्वत:ला कीर्तनकार म्हणवतात आणि महिलांचे धिंडवडे काढतात. हे खपवून घेतले जाणार नाही, अशी भूमिका शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी घेतली. तर सुप्रिया सुळे या महिलांचं नेतृत्व करतात. बंडातात्यांनी महिलांचा अपमान केलाय, त्यामुळे बंडातात्यांनी महिलांची माफी मागितली पाहिजे, अशी आक्रमक मागणी रुपाली पाटील यांनी केली.
बंडातात्या कराडकर यांच्या वक्तव्यानंतर चांगलाच वाद पेटला आहे. त्यांच्यावरोधात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची महिला आघाडी आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या बंडातात्यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करणार आहेत. तसेच कराडकर यांच्याविरोधात पुण्यातील खडक पोलिसांत रुपाली पाटलांनी तक्रार दिलेली आहे. याच तक्रारीसंदर्भात पुणे पोलिसांची आज बैठक होणार आहे. या बैठकीत कराडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करायचा की नाही ? याचा निर्णय होणार आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या 10.30 वाजता पुण्यातील ज्ञानेश्वर पादुका चौकात आंदोलन करणार आहेत.
दरम्यान बंडातात्या कराडकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. माझ्याकडून हे विधान अनावधानाने झाले आहे. त्यामुळे मी माफी मागतो, असे बंडातात्या कराडकर म्हणाले आहेत. मी फक्त एवढंच बोललो नाही. माझं तेवढंच वक्तव्य दाखवण्यात आलं, असंही बंडातात्या कराडकर यांनी म्हटलंय.
इतर बातम्या :
Nagpur NMC | नागपूर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना; काँग्रेसच्या नगरसेवकांची नाराजी नेमकी काय?
काय सांगता? 16 लाखाचं सोयाबीन चोरीला, मुख्य बाजारपेठेत व्यवहारही वाढले अन् चोरीच्या घटनाही