बारामती लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाचा पराभव झाला. शरद पवार यांनी पुन्हा बाजी मारली. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांनी दणदणीत पराभव केला. अगदी बारामती विधानसभा मतदार संघातही सुप्रिया सुळे यांना जास्त मते मिळाली. यामुळे बारामतीमध्ये अजित पवार यांची विधानसभेत कस लागणार आहे. त्याचवेळी शरद पवार गटाकडूनही विधानसभेची तयारी सुरु केली आहे. अजित दादांऐवजी नवीन दादा तयार केला गेला आहे. अजित पवार यांना डिवचणारे बॅनर्स त्यासाठी बारामतीमधील सुपामध्ये लावण्यात आले आहे. ‘वादा तोच दादा नवा’, असे बॅनर्स लावले आहे. त्यात बारामतीचा नवीन दादा युगेंद्र पवार यांना म्हटले गेले आहे. यामुळे विधानसभेत पुन्हा पवार गटात लढाई जुंपणार आहे. अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होणार आहे. युगेंद्र पवार अजित पवार यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहे.
सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बारामतीमधील सुपा येथे बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्या बॅनर्सवर ‘वादा तोच दादा नवा’ असे लिहिले असून युगेंद्र पवार यांच्या फोटो लावला आहे. तसेच “हर वाल का पलटवार हुं मै, युही नही कहलाता शरद पवार हुं मै ” असे वाक्य लिहून सुप्रिया सुळे यांना चौथ्यांदा विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. या बॅनर्सची चर्चा सर्वत्र रंगली आहे.
युगेंद्र पवार बारामतीमधून विधानसभा निवडणूक लढविणार आहे, आशी चर्चा सुरू आहे. त्यासाठी त्यांच्या नावाची चर्चा आतापासून सुरु आहे. त्यातच आता बॅनर लावल्याने चर्चांना उधाण आले. बॅनरवर लिहिलेल्या मजकुरावरून अजित पवार यांना डिवचले आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावले आहे.
युगेंद्र पवार सातत्याने अजित पवार यांच्यावर टीका करत असतात. रोहित पवार यांच्यानंतर युगेंद्र पवार अजित पवार यांच्यावर हल्ला करण्याची संधी सोडत नाही. यामुळे लोकसभेनंतर विधानसभेत काका-पुतण्याची लढत रंगणार आहे.