बारामती लोकसभा मतदार संघात पवार कुटुंबियांमध्ये लढत होत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत असणाऱ्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही लढत रंगणार आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात आहे. त्यांना आता घरातूनच आव्हान दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार मैदानात उतरल्या आहेत. सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासोबत शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी अन् मनसेसुद्धा आहे. आता स्वत: राज ठाकरे सुनेत्रा पवार यांच्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत.
अजित पवार यांच्या निवासस्थानी मनसेची बैठक झाली. या बैठकीला मनसेचे नेते उपस्थित होते. बैठकीत बारामती लोकसभा मतदारसंघाविषयी चर्चा झाली. या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघात मनसेचे तालुकास्तरीय मेळावे घेण्यात येणार आहेत. तसेच राज ठाकरे यांची सभा ही सुनेत्रा पवार यांच्यासाठी होणार आहे. या सभेची वेळ आणि ठिकाण ठरलेलं नाही. लवकरच ठिकाण ठरवलं जाईल. अशी माहिती मनसे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटसकर यांनी दिली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतील बिनशर्त पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे यांच्या पक्षाचे पदाधिकारी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले होते. त्यासाठी जबाबदाऱ्या निश्चित केल्या. यामुळे लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे सक्रीय झाले आहे. लोकसभा निवडणूक राज ठाकरे लढवणार नसले तरी विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.
लोकसभा निवडणुकीचे भर राज ठाकरे यांना विधानसभेत भरुन मिळणार आहे. त्यावेळी चर्चेत राज ठाकरे यांच्या मनसेला समाधानकारक जागा मिळणार आहे. भाजप वरिष्ठ नेत्यांनी राज ठाकरे यांना तसे आश्वासन दिले आहे. त्यामुळे लोकसभेनंतर विधानसभेत राज ठाकरे यांची तोफ धडधडणार आहे.