बारामती लोकसभा मतदार संघात नणंद-भावजयी लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गट आणि एकाच परिवारातील दोन सदस्यांमध्ये ही लढत होत आहे. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनैत्रा पवार यांच्या लढतीकडे देशाचे लक्ष लागले आहे. आज बारामती मतदार संघासाठी मतदान सुरु आहे. त्याचवेळी सुप्रिया सुळे बारामतीमधील काठेवाडीत मतदानासाठी दाखल झाल्या. त्यानंतर त्या थेट अजित पवार यांच्या निवासस्थानी पोहचल्या. पाच मिनिटे त्या ठिकाणी होत्या. त्यानंतर त्या निघून गेल्या. त्याची चांगली चर्चा सुरु झाली आहे.
सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या काठेवाडी येथील घरी मंगळवारी ११ वाजेच्या सुमारास दाखल झाल्या. त्यावेळी घरात अजित पवार होते. परंतु सुनेत्रा पवार नव्हत्या. त्या काकींची भेट घेणे आणि प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांची आणि अजित पवार यांच्याशी काही चर्चा केली नाही. त्या फक्त त्यांच्या काकी आशाताई पवार यांनाच भेटल्या, असे त्यांनी सांगितले. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मी आशा काकी यांना नमस्कार करण्यासाठी आले होते. घरात फक्त मी आणि काकीच होते. मी फक्त काकींची भेट घेतली. तुम्ही अजित पवार यांच्या घरी अचानक आल्या? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांचा विचारला. त्यावेळी त्यांनी सांगितले, हे माझ्या काका, काकींचे घर आहे. माझ्या आयुष्यातील लहाणपण याच घरात गेले आहे. मी या घरात दोन- दोन महिने राहिले आहे. त्यावेळी दोन-दोन महिने माझ्या आईशी बोलणे होत नव्हते. जेवढे माझ्या आईंनी माझे केले नाही, तेवढे माझ्या सर्व काकींनी माझ्यासाठी केले, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
पवार कुटुंबामधील या लढतीत रोहित पवार आक्रमक होऊन अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांवर आरोप करत आहेत. त्याचे पुरावे सोशल मीडियावर देत आहेत. त्याचवेळी सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या. राजकीय लढाई आणि कौटुंबिक संबंध वेगळे असणार? हे या भेटीतून स्पष्ट झाले आहे.