बारामतीत दोन-दोन ‘तुतारी’ चिन्हं, कुणाला मतदान करावं? मतदार संभ्रमात पडणार?

| Updated on: Apr 23, 2024 | 9:50 PM

बारामतीत सुप्रिया सुळेंचं तुतारी अर्थात तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आहे. मात्र बारामतीतील एका अपक्षाला निवडणूक आयोगानं ट्रम्पेट चिन्ह दिलंय. या ट्रम्पेटचं मराठी भाषांतर करताना त्यालाही तुतारी नाव देण्यात आलंय. त्यामुळे चिन्हाद्वारे मुद्दाम मतदारांमध्ये संभ्रम पसरवण्याचा आरोप विरोधक करत आहेत.

बारामतीत दोन-दोन तुतारी चिन्हं, कुणाला मतदान करावं? मतदार संभ्रमात पडणार?
बारामतीत दोन-दोन 'तुतारी' चिन्हं
Follow us on

निवडणूक आयोगाच्या कारभारावरुन वारंवार प्रश्न उभे राहत आहेत. कारण घड्याळ चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्यानंतर निवडणूक आयोगाने माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या पक्षाला तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं चिन्ह दिलं. पण आता बारामती लोकसभेत अजून एका अपक्ष उमेदवाराच्या चिन्हाला निवडणूक आयोगानं तुतारी नावं देवून टाकलंय, ज्यामुळे शरद पवार गटाचे नेते आक्रमक झाले आहेत. याद्वारे जाणीवपूर्वक मतदारांमध्ये संभ्रम पसरवण्याची शंका विरोधकांनी वर्तवलीय. सुप्रिया सुळेंचं तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आहे. तर एका अपक्ष उमेदवारास ट्रम्पेट हे चिन्ह मिळालंय. वास्तविक या चिन्हाला इंग्रजीत ट्रम्पेट म्हटलं जातं. ज्याला आपण पिपाणी म्हणतो. मात्र निवडणूक आयोगानं त्याचं मराठी भाषांतर ‘तुतारी’ असं केलंय. म्हणजे प्रथमदर्शनी चिन्ह वेगळे असले तरी सुळेंच्या चिन्हाचं नाव तुतारी वाजवणारा माणूस असं असेल. तर अपक्ष उमेदवाराच्या चिन्हाचं नाव फक्त तुतारी असं असणाराय.

यावर घेण्यात आलेला आक्षेप डावलून बारामती लोकसभेच्या निवडणूक अधिकारी कविता द्विवेदींनी अपक्षास तुतारी चिन्ह कायम ठेवलंय. याविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुप्रिया सुळे तक्रार करणार आहेत. तुतारी फुंकणारा माणूस आणि तुतारी या दोन्ही चिन्हांच्या नावात साधर्म्य आहे. ज्यामुळे मतदारांचा गोंधळ उडू शकतो. त्यामुळे मराठी नावातील तुतारी हा शब्द बदलून दुसरा शब्द निवडणूक आयोगानं द्यावा ही विनंती, अशी मागणी करण्यात आलीय. हे चिन्ह तुतारीचं नसून पिपाणीचं आहे. हे महाराष्ट्रातला कोणताही व्यक्ती सांगेल. त्यामुळे निवडणूक आयोगाला पिपाणी आणि तुतारीतला फरकच कळेनासा झाला आहे का? असाही प्रश्न विचारला जातोय.

जर असाच पायंडा पडला तर भविष्यात एका उमेदवाराला कप आणि दुसऱ्यास बशी हे चिन्ह मिळू शकतं. अजित पवारांचं चिन्ह टेबलावरचं घड्याळ असलं तर दुसऱ्या उमेदवाराच हातावरचं घड्याळ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकाला धनुष्यबाण चिन्ह असेल तर दुसऱ्यास फक्त बाण चिन्ह द्यायचं का? असाही प्रश्न उद्धभवू शकतो. नाम साधर्म्यानं गोंधळ उडेल हे स्वतः भुजबळही मान्य करत आहेत.

माढ्यातही असाच प्रकार

बारामतीप्रमाणेच माढा लोकसभेतही असाच प्रकार घडलाय. माढ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून धैर्यशील मोहिते-पाटील तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर लढत आहेत. तर एका अपक्ष उमेदवारास ट्रम्प्टेटचं चिन्ह मिळालंय, ज्याचं मराठी भाषांतर निवडणूक आयोगानं तुतारी असंच केलंय. माढा लोकसभेत ट्रम्प्टेट चिन्ह मिळालेला उमेदवार बहुतांश लोकांना माहिती नाहीय. मात्र नावाच्या साधर्म्यामुळे संभ्रम निर्माण होऊ शकतो, असं मतदार म्हणत आहेत.

गुगल भाषांतरावर तुम्ही ट्रम्पेटचं मराठी भाषांतर केलं तरी उत्तर कर्णा अर्थात पिपाणी असं मिळतं. पण इंग्रजीतलं ट्रम्पेट वाद्य म्हणजे मराठी भाषेतील तुतारी हा नवीन शोध म्हणायला हवा. भविष्यात जर आपण संबळ, हलगी, डफ, मृदंग आणि ढोलकी या 5 वाद्यांना एकच नाव दिलं तर गोंधळ होईल. रचना, ध्वनी आणि प्रसंगानुसार वाद्य बदलतं. जसं गोंधळावेळी संबळ, मिरवणुकीवेळी हलगी, पोवाड्यावेळी डफ, कीर्तनावेळी मृदंग आणि तमाशावेळी ढोलकीचा वापर होतो. तसंच कोणताही वाक नसलेल्या या वाद्याला शहनाई म्हणतात, जी मंगलप्रसंगी वाजवली जाते.

पूर्ण वाक दिलेल्या छोट्या वाद्याला बिगूल म्हणतात. जे साधारणपणे पोलीस बँड पथकात दिसतं. लंबवर्तुळाकार पद्धतीनं वाक दिलेल्या या वाद्याला ट्रम्पेट म्हणतात. जे मूळ इंग्रजी वाद्य आहे, ज्याला ग्रामीण भागात पिपाणी म्हणतात, ज्याचा वापर लग्नाच्या वरातीत होतो आणि पूर्ण वाक न देता ‘सी’च्या आकारात वाकवलेल्या वाद्याला तुतारी म्हणतात. जी लढाईची सुरुवात, आगमन, शुभप्रसंग किंवा हल्ली लग्नावेळी वाजवली जाते. पण निवडणूक आयोग या चिन्हाला तुतारी म्हणतंय, आणि या ट्रम्पेट वाद्याचं मराठी नावं सुद्धा निवडणूक आयोगाच्या मते तुतारीच आहे.